लेख – स्त्री शिक्षणाची 170 वर्षे
>> प्रा. डॉ. गणेश राऊत
आमच्या समाजक्रांतीचे जनक’ अशा शब्दांत ख्यातनाम लेखक व संशोधक धनंजर कीर यांनी महात्मा फुले यांचे वर्णन केले आहे. अज्ञानरूपी अंधःकारात अडकून पडलेल्या स्त्रीला शिक्षणरूपी उजेड दाखविण्याचे अवघड काम करण्याचे जोतिबा फुले यांनी ठरविले. महात्मा फुले यांनी 3 जुलै 1851 रोजी पुण्यातील बुधवार पेठेतील अण्णासाहेब चिपळूणकर यांच्या वाडय़ात मुलींची शाळा सुरू केली. आता या घटनेला 170 वर्षे पूर्ण होत आहेत म्हणून या घटनेचे हे कृतज्ञ स्मरण.
शिक्षण हेच सर्वांगीण सुधारणांचे मूळ अथवा प्रवेशद्वार आहे. यावर फुले यांचा विश्वास होता. स्वतःला आलेले विपरीत अनुभव, समाजातील विषमतेचे दर्शन, इंग्रजी शिक्षणाचा प्रभाव आणि वाचन यातून जोतिबांचे विचार अधिकाधिक परिपक्व होत गेले. त्यांनी स्त्र्ायांना शिक्षण देण्याचे ठरविले. हा त्यांचा मार्ग तत्कालीन समाजासाठी ‘वैचारिक धक्का’ होता. परंपरेने स्त्र्ायांना शिक्षणापासून दूर ठेवले होते. माजघरातील चूल आणि मूल, त्याच्याच जोडीला आतील खोलीमधील अंधार हाच तिच्या आयुष्यभर सोबतीला होता. अशा अज्ञानरूपी अंधःकारात अडकून पडलेल्या स्त्रीला शिक्षणरूपी उजेड दाखविण्याचे अवघड काम करण्याचे जोतिबा फुले यांनी ठरविले. ठरविणे सेपे होते, परंतु मार्ग काटय़ाकुटय़ांनी भरलेला होता. यासंदर्भात कीर लिहितात – ‘‘जीवित पूर्णपणे विकसित करण्याचे आणि जगण्याचे शिक्षण हे एक प्रमुख साधन आहे. कोणत्याही समाजात द्रुतगतीने स्थित्यंतर घडवून आणण्यापूर्वी शिक्षणाचा प्रसार करणे अत्यावश्यक असते. ती मूलभूत अशी एक आवश्यकताच असते. शिक्षणाने मनुष्याला सत्यासत्याचा नि अंतिम हिताचा विचार करण्याची शक्ती प्राप्त होते; स्वाभिमानाची जाणीव त्याच्यात जागृत होते. म्हणून शिक्षण हे सर्व सुधारणेचे मूळ आहे.’’
मनात आलेले उदात्त विचार कृतीत आणण्यासाठी फुले दांपत्याने आपले आयुष्य वाहून घेण्याचा निर्णय घेतला. अशातच मित्रवर्य गोवंडे सदाशिवराव यांच्याबरोबर नगर येथे जाणे झाले. अमेरिकन मिशनच्या मिल फॅरार बाईंच्या शाळेला फुले यांनी भेट दिली. या शाळेतील व शाळेच्या कार्यपद्धतीने फुले भारावून गेले. मिल फॅरार यांच्याशी झालेल्या चर्चेत फॅरार यांनी स्त्री शिक्षणाकडे झालेल्या दुर्लक्षाबद्दल चिंता व्यक्त केली. परतीच्या प्रवासात जोतिबांचे विचार अधिकच पक्के झाले. प्रत्येकाने आपल्या पत्नीस शिक्षण दिल्यास हा प्रश्न सुटण्यास मदत होईल असे या दोघांनाही वाटले. अखेर 1848 मध्ये पुण्यातील बुधवार पेठेतील भिडे वाडय़ात मुलींची पहिली शाळा सुरू झाली. शाळा सुरू झाल्यावर मुलींना आणि शिक्षणाची आवड असणाऱया मुलांना प्रवेश देण्यात आला. वाचन, अंकगणित आणि व्याकरणाची मूलतत्त्वे हे विषय संस्थापक जोतिबा शिकवीत होते.
सखाराम परांजपे, सदाशिव हाटे, सदाशिवराव गोवंडे अशा सक्रिय मित्रांच्या मदतीने हा उपक्रम सुरू झाल्यावर पुणे शहरात त्या काळी विरोधाचे सूर उमटले. मुलींना शिकविणे, त्यातही पुरुषाने शिकविणे, म्हणजे धर्म बुडाला असे कित्येकांना वाटू लागले. त्या काळी स्त्र्ायांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. मुलगी शिकली तर तिचा नवरा मृत्यू पावणार, स्त्र्ायांनी चपला व छत्री वापरणे आणि नवऱयाशी सगळय़ांसमोर बोलणे या गोष्टींना समाजमान्यता नव्हती. एवढेच नव्हे तर, जेवताना पुरुष अगोदर जेवणार, पत्नी नंतर जेवणार, नवरा परगावी नोकरी करीत असेल तर पत्नीने सासरीच राहायचे. त्याच्याबरोबर न जाणे अधिक चांगले, स्त्री शिकल्यास ती बिघडणार, तिला सर्वार्थाने जखडून टाकण्यात, पारतंत्र्यात ठेवण्यातच समाजाचे भले आहे, असे अत्यंत प्रतिगामी विचार त्या काळी अस्तित्वात होते.
पुरुषच मुलींना कसा काय शिकविणार? या आक्षेपावर जोतिबांनी जी कृती केली ती हिंदुस्थानच्या आजवरच्या इतिहासातील ‘अभूतपूर्व’ कृती होती. त्यांनी सावित्रीबाईस शिक्षिका म्हणून तयार केली. आता तर सनातन्यांवर आकाशच कोसळले. सगळय़ांना धक्का बसला. आधुनिक हिंदुस्थानच्या इतिहासातील हा ‘टर्निंग पॉइंट’ होय. कीर यासंदर्भात लिहितात – ‘‘सावित्रीबाईंचा शिक्षणक्षेत्रात प्रवेश झाल्यापासून हिंदू स्त्री पुन्हा सार्वजनिक क्षेत्रात उतरली.’’
जोतिबांना शिक्षणक्षेत्रातून बाहेर काढण्यासाठी सनातन्यांनी जोतिबांचे वडील गोविंदराव फुले यांच्यावर दडपण आणले. ‘घर की शाळा’ असा प्रश्न दोघांमध्ये उभा ठाकला. ‘मेलो तरी बेहत्तर, परंतु शिक्षणकार्य सोडणार नाही’ अशी भूमिका जोतिबांनी घेतली. आणि समाज बदलण्याच्या उद्योगास सुरुवात झाली. प्रत्येकाच्याच आयुष्यात असे प्र्रश्न येत असतात. आपण काय भूमिका घेतो यावर आपले भवितव्य ठरत असते. या शाळेचे कामकाज चालविताना सावित्रीबाई फुले यांना प्रचंड विरोधाला तोंड द्यावे लागले. सावित्रीबाईंना दगडधोंडे मारणारे, शिवीगाळ करणाऱयांच्या नावांची नोंद इतिहासात नाही. सावित्रीबाईंच्या नावाचे मात्र विद्यापीठ आहे, यातच सगळे आले. या दोघांनीही अफाट कष्ट घेऊन, प्रसंगी उपाशीपोटी राहून शाळा चालविली. दुर्दैवाने ही शाळा अल्पायुषी ठरली. जोतिबांचे स्नेही केशव शिवराम भवाळकर सावित्रीबाईंना शिकविण्याचे कामी मदत करत होते. त्यांनीच पुढे ‘अध्यापनशास्त्र्ााचे ज्ञान देण्यासाठी स्त्र्ायांचा एक वर्ग’ सुरू केला.
पुढे आर्थिक परिस्थिती बदलल्यावर याच शाळेचे पुनरुज्जीवन फुले यांनी जुनागंज पेठेत केले. या कामी सदाशिवराव गोवंडे यांचे सहकार्य झाले. मुलामुलींना पाटी-पेन्सिल आणि त्या काळात महिना दोन रुपये एवढी मदत सदाशिवराव शाळेला करत होते. याच शाळेत विष्णुपंत थत्ते या शिक्षकांची मदत झाली. या शाळेतील मुलांना सार्वजनिक हौदावर आणि विहिरीवर पाणी प्यायला मिळत नव्हते. ते पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत होते. फुले कुटुंबीयांना कोणकोणत्या प्रश्नांचा सामना करावा लागत होता हे आपणास यावरून समजू शकते. या शाळेची जागा अपुरी पडल्यावर नवी जागा भाडय़ाने घेण्यात आली. या शाळेसाठी मोरो विठ्ठल वाळवेकर, देवराव ठोसर, मेजर कँडी यांची मदत झाली.
या अनुभवांच्या जोरावर आणि सामाजिक पार्श्वभूमीवर दुसरी शाळा 3 जुलै 1851 रोजी सुरू झाली. या शाळेत जोतिबा रोज चार तास विनावेतन शिकवीत होते. शिक्षणक्षेत्र सामूहिक जबाबदारीचे क्षेत्र आहे याची जाणीव त्यांना होती. या शाळेसाठी त्यांनी कार्यकारी मंडळ स्थापले. जगन्नाथ सदाशिव, केशवराव थवाळकर (जोशी), अण्णा सहस्रबुद्धे, बापूरावजी मांडे, वि. मो. भिडे, कृष्णशास्त्री चिपळूणकर, विष्णुशास्त्री पंडित या मंडळींनी शाळेच्या कामकाजात रस घेतला होता. शाळेच्या मुख्याध्यापिका सावित्रीबाई यासुद्धा विनावेतन काम करीत होत्या. ज्या दिवशी शाळा सुरू झाली त्याच दिवशी आठ मुली शाळेत होत्या. सर्वांच्याच सहकार्याने शाळेत काही दिवसांतच सहापट प्रगती (48 मुली) केली. हे सगळे योगदान ऐकून महात्मा गांधी 1932 मध्ये पुण्यातील येरवडा तुरुंगात असताना म्हणाले – ‘‘जोतिबा हे खरे महात्मा होते!’’