स्वित्झर्लंड ‘शूट’ वर्ल्ड चॅम्पियन फ्रान्स ‘आऊट’, पेनल्टी शूटआऊटमध्ये 5-4ने हार
वर्ल्ड कप विजेता फ्रान्सच्या फुटबॉल संघाच्या स्वप्नांना सोमवारी मध्यरात्री सुरुंग लागला. फिफा रँकिंगमध्ये 16व्या स्थानावर असलेल्या स्वित्झर्लंडने दुसऱया स्थानावर असलेल्या फ्रान्सवर पेनल्टी शूटआऊटमध्ये 5-4 अशा फरकाने थरारक विजय मिळवून युरो फुटबॉल चॅम्पियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. या पराभवासह फ्रान्सचे या स्पर्धेतील आव्हान अंतिम 16 फेरीमध्येच संपुष्टात आले. स्वित्झर्लंडने मात्र 1954 सालानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठय़ा स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तब्बल 67 वर्षांनंतर त्यांना अशी करामत करता आलीय हे विशेष. 1954 साली स्वित्झर्लंडने वर्ल्ड कपमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.
फ्रान्स-स्वित्झर्लंड लढतीची आकडेवारी
(निर्धारीत तसेच एक्स्ट्रा टाईमसह)
फ्रान्स स्वित्झर्लंड
- गोल 3 3
- शॉट 26 13
- शॉट ऑन टार्गेट 8 5
- बॉलवरील ताबा 53 47
- ऑफसाईड 1 1
- कॉर्नर्स 8 5
- यलो कार्ड 3 4
- रेड कार्ड 0 0
पूर्वार्धात दिग्गज संघ अपयशी
दिग्गज संघ फ्रान्स व ‘अंडरडॉग’ म्हणून ओळखला जाणारा स्वित्झर्लंड यांच्यामधील लढतीत फ्रान्सला विजयासाठी पसंती दर्शवण्यात आली होती. पण पूर्वार्धात स्वित्झर्लंडच्या फुटबॉलपटूंच्या चमकदार खेळासमोर वर्ल्ड कप विजेत्या संघातील खेळाडूंचा निभाव लागला नाही. हॅरीस सेफरोवीचने 15व्या मिनिटाला जबरदस्त गोल करीत स्वित्झर्लंडला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी पूर्वार्ध संपेपर्यंत कायम राहिली.
शेवटच्या दहा मिनिटांत कमबॅक
स्वित्झर्लंडला उत्तरार्धाच्या सुरुवातीला आघाडी वाढवण्याची सुवर्णसंधी होती. रिकार्डो रॉड्रिगेझ याला पेनल्टीवर गोल करता आला नाही. त्यानंतर फ्रान्सच्या फुटबॉलपटूंनी झोकात पुनरागमन केले. करीम बेन्झेमाने 57 व 59व्या मिनिटाला आणि पॉल पोग्बा 75व्या मिनिटाला सॉल्लीड गोल करीत फ्रान्सला 3-1 असे पुढे नेले. स्वित्झर्लंडच्या खेळाडूंनी या वेळी हार मानली नाही. अखेरच्या दहा मिनिटांमध्ये त्यांनी दोन गोल करीत जबरदस्त कमबॅक केले. हॅरीस सेफरोवीचने 81व्या मिनिटाला व मारीयो गॅवरानोवीचने 90व्या मिनिटाला गोल केला. निर्धारीत वेळेत 3-3 अशी बरोबरी झाल्यानंतर ही लढत एक्स्ट्रा टाईममध्ये गेली. पण 30 मिनिटांच्या खेळानंतरही निकाल काही लागला नाही. अखेर निकाल लागण्यासाठी पेनल्टी शूटआऊटचा अवलंब करावा लागला.
एकाच दिवशी विजेता अन् उपविजेता स्पर्धेबाहेर
युरो फुटबॉल चॅम्पियनशिपमध्ये सोमवारी (28 जून 2021) दोन महत्त्वाच्या लढती पार पडल्या. या एका दिवशी रशिया येथे झालेल्या वर्ल्ड कपमधील विजेता (फ्रान्स) व उपविजेता (क्रोएशिया) हे दोन्ही संघ पराभूत झाले. या दोन्ही संघांचे या स्पर्धेतील आव्हानही तेथेच संपुष्टात आले. स्पेनने क्रोएशियाला एक्स्ट्रा टाईमपर्यंत रंगलेल्या लढतीत 5-3 अशा फरकाने हरवत उपांत्यपूर्व फेरीत वाटचाल केली. आता स्पेन-स्वित्झर्लंड यांच्यात उपांत्यपूर्व फेरी होणार आहे.
मागील युरोमधील पराभवाच्या आठवणी मागे टाकल्या
स्वित्झर्लंडला 2016 साली झालेल्या युरो फुटबॉल चॅम्पियनशिपमधील अंतिम 16 फेरीत पोलंडकडून पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-5 अशा फरकाने हार सहन करावी लागली होती. मात्र यंदाच्या युरो फुटबॉल चॅम्पियनशिपमध्ये या संघाने त्या आठवणींना लीलया मागे टाकले. मारीयो गॅवरानोवीच, फॅबीयन शार, मॅन्युअल अकांजी, रुबेन वर्गास व अॅडमीर मेहमेदी या पाचही फुटबॉलपटूंनी पेनल्टी शूटआऊटमध्ये दमदार गोल केले. फ्रान्सकडून पॉल पोग्बा, ओलीव्हर जिरू, मार्कस थुरम, प्रेसनेल किमपेंबे यांनी गोल केले. किलीयन एमबाप्पेची कीक स्वित्झर्लंडचा गोलकिपर यान समेर याने रोखली आणि स्वित्झर्लंडने तब्बल 1938 सालानंतर बाद फेरीत विजय मिळवला.
पेनल्टी शूटआऊटमधील संघांची कामगिरी
- स्वित्झर्लंड (5) फ्रान्स (4)
- मारीयो गॅवरानोवीच पॉल पोग्बा
- फॅबीयन शार ओलीव्हर जिरू
- मॅन्युअल अकांजी मार्कस थुरम
- रुबेन वर्गास प्रेसनेल किमपेंबे
- अॅडमीर मेहमेदी किलीयन एमबाप्पे