कोरोना रुग्णसंख्येत वाढ; इस्त्रायलमध्ये पुन्हा मास्क अनिवार्य
मोठ्या प्रमाणावर झालेले कोरोना लसीकरण आणि बाधितांची संख्या कमी झाल्याने मास्क वापराचे निर्बंध शिथिल करणाऱ्या इस्त्रालयने पुन्हा एकदा मास्कचा वापर करणे अनिवार्य केले आहे. मागील काही दिवसांपासून इस्त्रालयमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
इस्त्रायली आरोग्य मंत्रालयाने बंदिस्त सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्यास सांगितले आहे. जवळपास 10-12 दिवसांपूर्वीच हा निर्णय मागे घेण्यात आला होता. इस्त्रालयमध्ये डेल्टा व्हेरिएंटचा फैलाव होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे म्हटले जात आहे. मागील काही दिवसांमध्ये इस्त्रायलमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे् प्रशासन चिंतेत आहे. येत्या काही दिवसात कोरोनाबाधित आढळण्याचा दर दुप्पट होण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. कोरोना डेल्टा व्हेरिएंटमुळे संसर्ग वाढत असल्याची शक्यता इस्त्रायलच्या महासाथ आजार टास्क फोर्सचे प्रमुख नॅचम अॅश यांनी व्यक्त केली. कोरोनाबाधितांची संख्या आणि कोरोना बळींची संख्या फारशी वाढली नसल्याचे त्यांनी म्हटले. कोरोना लशींमुळे बचाव होत असून गंभीर आजारी झाल्याने रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या कमी राहील, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच इस्त्रालयचे पंतप्रधान नफ्टाली बेनेट यांनी कोरोनाबाधितांची संख्य़ा वाढल्यानंतर नागिरकांना इशारा दिला होता. परदेशातून येणाऱ्या नागरिकांमुळे इस्त्रायलमध्ये डेल्टा व्हेरिएंट फैलावत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय विमानतळावर अधिक कठोरपणे चाचणी केली जाणार आहे. इस्त्रायलच्या नागरिकांनीही परदेशवारी कमी करण्याचे आवाहन पंतप्रधान बेनेट यांनी केले.