मोबाईल नसलेल्या विद्यार्थ्यांची भरणार शाळा, सोलापूर जिल्हा परिषदेची माहिती
सोलापूर जिल्ह्यातील एक हजार 140 गावांपैकी आतापर्यंत 678 गावे कोरोनामुक्त झाली आहेत. या गावांमधील शाळा ऑफलाइन सुरू करण्यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्हाधिकाऱयांना प्रस्ताव दिला आहे. तोवर कोरोनामुक्त गावांमधील ज्या मुलांकडे ऑनलाइन शिक्षणासाठी ऍण्ड्रॉइड मोबाईल नाहीत, त्यांचीच मोकळ्या वातावरणात ऑफलाइन शाळा भरविण्यासंदर्भात शिक्षकांना सूचना केल्या असून, याची सुरुवात झाल्याची माहिती स्वामी यांनी दिली.
ग्रामीण भागातील बहुतेक मुलांकडे ऑनलाइन शिक्षणासाठी ऍण्ड्रॉइड मोबाईल तथा तशी साधने उपलब्ध नाहीत. सध्या कोरोनामुळे शाळा बंद पण ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. पहिली ते नववी आणि अकरावीच्या शिक्षकांना 50 टक्क्यांच्या प्रमाणात शाळेत उपस्थित राहण्याचे बंधन आहे. उर्वरित 50 टक्के शिक्षकांनी ते ज्या शाळेत शिक्षक आहेत, तेथील विद्यार्थ्यांना झाडाखाली तथा समाजमंदिर, मंदिरात ऑफलाइन शिक्षण द्यावे, अशा सूचना केल्या आहेत.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडून ऑफलाइन शाळा सुरू करण्यास परवानगी मिळाल्यानंतर पूर्वीच्या निकषांचे काटेकोर पालन करून ऑफलाइन शाळा सुरू होतील, असेही स्वामी यांनी यावेळी स्पष्ट केले.
सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत विविध प्रकारची 13 अभियाने राबविली असून, त्याची फलनिष्पत्ती आता दिसून येत आहे. कोरोना रुग्णांबरोबरच मृतांची संख्याही कमी होऊ लागल्याचे त्यांनी सांगितले. तिसऱया लाटेच्या पार्श्वभूमीवर गावोगावी 0 ते 18 वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी सुरू आहे. कोरोनाकाळात शाळा बंद असल्याने मुलांमधील शिक्षणाची गोडी कमी होऊ नये म्हणून कोरोनामुक्त गावांमध्ये शाळा सुरू करण्याचे नियोजन आहे, असेही स्वामी म्हणाले.
ग्रामीण भागातील शिक्षणाचा टक्का वाढावा, विद्यार्थ्यांमधील शिक्षणाची गोडी कायम राहावी, कोरोनाकाळात त्यांच्या बौद्धिक क्षमतेवर परिणाम होऊ नये म्हणून कोरोनामुक्त गावांमध्ये ऑफलाइन शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव जिल्हा आपत्तिव्यवस्थापनप्रमुख तथा जिल्हाधिकाऱयांकडे पाठविला आहे.
– दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सोलापूर जिल्हा परिषद.