इंजिनीअरिंगचे डिप्लोमा प्रवेश सुरू, निकालापूर्वीच अर्ज करण्याची सवलत
इंजिनीअरिंग डिप्लोमा अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू झाली. तंत्रशिक्षण संचालनालयाने या अभ्यासक्रमाचे शैक्षणिक वर्ष 2021-22 च्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. दहावीच्या निकालाची वाट न पाहता तंत्रशिक्षण संचालनालयाने प्रवेशाला सुरुवात केली असून विद्यार्थ्याकडे गुणपत्रिका नसल्याने ऑनलाइन अर्जामध्ये विद्यार्थ्यांना केवळ बैठक क्रमांक नोंदवायचा आहे.
डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन अर्ज भरणे, कागदपत्रांच्या छायाप्रती अपलोड करणे यांसह कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज निश्चिती करण्याची मुदत 23 जुलैपर्यंत आहे, तर तात्पुरती गुणवत्ता यादी 26 जुलै रोजी जाहीर होणार आहे. उमेदवाराने राज्य मंडळाच्या 2021 च्या दहावीच्या परीक्षेत प्राप्त केलेले गुण संबंधित विद्यार्थ्याच्या प्रवेश अर्जामध्ये दर्शविण्यात येणार आहेत. कागदपत्रे तपासणीसाठी विद्यार्थ्यांना दोन पर्याय देण्यात आले आहेत. यामध्ये ई-स्क्रुटिनी, सर्व सुविधा केंद्रात येऊन कागदपत्रांची प्रत्यक्ष छाननी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वेळापत्रकानुसार अर्ज भरणे, कागदपत्र तपासणी, अर्ज निश्चिती आणि अंतिम गुणवत्ता यादी ही सर्व प्रक्रिया 30 दिवसांची असणार आहे.
- प्रवेशाबाबत काही अडचणी असल्यास विद्यार्थी 8698742360, 8698781669 या क्रमांकांवर सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या वेळेत संपर्क साधू शकतात.
- अधिक माहितीसाठी https://ift.tt/3wbNzEi या वेबसाईटला भेट द्यावी.
असे आहे वेळापत्रक - ऑनलाइन अर्ज भरणे 30 जून ते 23 जुलै
- कागदपत्र पडताळणी आणि अर्ज निश्चिती z 30 जून ते 23 जुलै
- तात्पुरती गुणवत्ता यादी – 26 जुलै
- गुणवत्ता यादीवरील आक्षेप – 27 ते 29जुलै
- अंतिम गुणवत्ता यादी – 31 जुलै