कृषी विभाग, विद्यापीठाने शेतकऱयांचे कष्ट कमी करण्यासाठी काम करावे, कृषिमंत्री दादा भुसे यांचे मत
कृषी विद्यापीठ, कृषी विभाग आणि अन्नदेवता म्हणून ओळखला जाणारा शेतकरी हे एक कुटुंब असून, शेतकऱयांचे कष्ट कमी करून शेतीचे उत्पादन आणि शेतकऱयांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठाने काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले.
महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठात सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील, संचालक संशोधन व विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. शरद गडाख, कृषी विभागाचे संचालक विकास पाटील उपस्थित होते. यावेळी कृषिमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते विद्यापीठाच्या उद्यानविद्या विभागाच्या प्र-क्षेत्रावरील विविध फळपिकांचे प्रात्यक्षिक प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. भुसे यांनी विद्यापीठाच्या कास्ट-कासम प्रकल्पालाही भेट दिली.
मंत्री दादा भुसे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार पिकाच्या उत्पादकतेबरोबर पोषकता कशी वाढेल, यावर संशोधनात भर द्यावा. नावीन्यपूर्ण संशोधन करणाऱया शेतकऱयांशी कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागाने समन्वय वाढविण्याची गरज आहे. शेतकरी बाजारपेठेच्या मागणीनुसार नवीन पिकांची मागणी करीत असल्याने परदेशी भाजीपाला व फळे यावर कृषी विद्यापीठांनी आपले संशोधन करावे. यासाठी बाहेरच्या देशातून काही वाण आणण्याची गरज पडली तर त्यासाठी विशेष बाब म्हणून परवानगी देण्यात येईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार ‘विकेल ते पिकेल’ या सदराखाली बाजारपेठेच्या मागणीनुसार वाण विकसित करणे, संशोधनात परदेशी पिकांचा आंतरभाव करणे व त्याचा शेतकऱयांपर्यंत प्रसार करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, कृषी विद्यापीठात विविध संशोधन, शिक्षण व विस्तार कार्य प्रगतिपथावर सुरू आहे. विद्यापीठाच्या संशोधनाला गती देण्यासाठी बंद झालेला विद्यापीठ आकस्मिक निधी पुन्हा सुरू करणे आवश्यक आहे. संशोधन, शिक्षण आणि विस्ताराला अधिक चालना देण्यासाठी विद्यापीठातील 50 टक्के रिक्त जागा भरण्यास शासनस्तरावर परवानगी, तसेच राष्ट्रीय कृषिविकास योजनेअंतर्गत संशोधनाला गती मिळण्यासाठी 10 टक्के निधी मिळावा, अशी मागणी त्यांनी केली.