पुणेकरांनो, पाचच्या आत घरात; संचारबंदी लागू
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरात पुन्हा सोमवारपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे दररोज संध्याकाळी पाच ते पहाटे पाच वाजेपर्यंत नागरिकांना विनाकारण भटकंती करता येणार नाही. अत्य़ावश्य़क सेवा वगळता, घराबाहेर फिरणाऱ्याविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यता येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. नागिरकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आओवाहन सहपोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र शिसवे यांनी केले आहे.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. शहरात पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आल्यामुळे पोलिसांनी बेशिस्तांविरुद्ध कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार जागोजागी नाकाबंदी, पेट्रोलिंग आणि चेकिंगला प्राधान्य दिले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे.
नागिरकांसह कामगारांना संध्याकाळी पाचच्या आतमध्ये घरी पोहोचावे लागणार आहे. नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी मागितलेल्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. रुग्णांना डबा पोहोच करणे, औषधोपचारांसाठी इतर ठिकाणी प्रवास करणे, रुग्णासोबत प्रवास करणाऱ्यांची कारवाईपासून सुटका करण्यात आली आहे.
”कोरोना रुग्णसंख्येच्या वाढत्या पार्श्वभूमीवर शहरात पुन्हा संचारबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार संध्याकाळी पाच ते पहाटे पाच वाजेदरम्यान विनाकारण भटकंती, अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली फिरणे, विनामास्क प्रवास, कोरोना नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या नागरिकांना पुरावा दाखविल्यानंतर सोडले जाणार आहे. तसेच रुग्णसेवा, अत्यावश्यक सेवेतील वाहनचालकांना सूट दिली जाणार आहे. नागिरकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे.”
डॉ. राजेंद्र शिसवे, सह पोलीस आयुक्त, पुणे