आभाळमाया – लघुग्रहांचा पट्टा
>> दिलीप जोशी
पाच अब्ज वर्षांपूर्वी आपलं सूर्यसंकुल निर्माण झालं तेव्हा त्यातून निर्माण झालेल्या अनेक अवकाशस्थ वस्तूंचा शोध घेण्याचं कुतूहल माणूस प्रगत अवस्थेत आल्यावर वाढत गेलं. आदिम मानवाला उगवता, मावळता सूर्य, रात्री कधी दिसणारा तर कधी न दिसणारा आणि सतत आकार बदलणारा चंद्र तसंच काळोख्या आकाशात चमचमणाऱया लक्षावधी तारका यांचं आधी भय, अप्रूप आणि नंतर कुतूहलजन्य संशोधनाची गोष्ट वाटली. त्यातूनच जगातल्या विविध संस्कृतींनी त्यांच्या भौगोलिक स्थानानुसार खगोलाचा अभ्यास नोंदवायला आरंभ केला. दक्षिण गोलार्धातला अग्रनद (अकेरनार) हा तारा युरोपीय अभ्यासकांना एकेकाळी दक्षिण आकाशातला ‘शेवटचा’ तारा वाटला. कारण त्यांना त्यापलीकडच्या दक्षिण अवकाशीय गोलार्धाचा अभ्यास करता येत नव्हता.
काळाच्या मर्यादा असूनही आणि प्रगत यंत्रसामग्री हाताशी नसताना हिंदस्थानात ब्रह्मगुप्त, वराहमिहीर, आर्यभट्ट, भास्कराचार्य यांनी केलेला खगोल अभ्यास विलक्षण आहे. पाश्चात्य देशातही आर्किमिडीस, पायथागोरस, टायको ब्राहे, गॅलिलिओ, हर्शल केपलर आदी मंडळी खगोल अभ्यासात रात्री जागवत राहिली. त्यातही दुर्बिणीच्या शोधाने तर (1610) या निरीक्षणात्मक अभ्यासाला अधिक गदी आली आणि नंतर त्याला गणितीय परिमाणंही लाभली.
सूर्यमालेत ग्रह किती? तर आपल्या प्राचीन सॅकरचनेतील ‘नवग्रहां’मध्ये स्वतः सूर्य, चंद्र, राहू, केतू यांचाही समावेश होतो. पुढे आधुनिक विज्ञानाने सूर्य हा जनक तारा, चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आणि राहू, केतू हे पृथ्वी-चंद्राची कक्षा छेदणारे बिंदू असल्याचं दाखवून दिलं. नव्या आधुनिक ग्रहमालेत आपल्या पृथ्वीचाही क्रमाने तिसरा ग्रह म्हणून समावेश झाला. काळाच्या ओघात अभ्यासात अशी प्रगती होतच असते. तरीही सोळा-सतराव्या शतकापर्यंत आपल्या सूर्यमालेचं संपूर्ण स्वरूप आपल्याला ठाऊक नव्हतं. हर्शलने युरेनसचा शोध लावला (1781) नंतर नेपच्यून व प्लुटोचीही आपल्या ग्रहमालेत भर पडली. यापैकी प्लुटो 2004मध्ये ‘ग्रहपद’ गमवून खुजा ग्रह (ड्वार्फ प्लॅनेट) ठरला. त्याचं कारण ‘शेरॉन’वरच्या लेखात नंतर पाहू.
असे दृश्य ग्रह-उपग्रह सापडत असताना सामान्य माणसं आश्चर्याने या शोधांविषयी ऐकत होती. सूर्यमालेत अज्ञानाच्या पडद्याआड नेमकं काय काय दडलंय याचा वेध घेणाऱयांनी भरपूर परिश्रम घेतले होते. अशाच काही निरीक्षणांमधून मंगळ आणि गुरू यांच्यामधला एक लघुग्रहांचा पट्टा किंवा ऍस्टेरॉईड बेल्ट सापडला. सापडला म्हणजे तो तिथेच होता. आपल्याला त्याचं अस्तित्व कळलं ते जोहान्स केपलरच्या अभ्यासातून. पूर्वी टायको ब्राहे याने केलेल्या नोंदी वाचताना केपलरला जाणवलं की मंगळ आणि गुरू या दोन ग्रहांमध्ये बरंच अंतर दिसतंय. ते इतकं की तिथे एका ग्रहाची कक्षा असू शकते, पण तो ग्रह मात्र दिसत नव्हता.
पुढे टायटस आणि बोड या संशोधकांनी ग्रहांच्या सूर्यापासूनच्या अंतराचं जे गणित मांडलं ते 3-6-12-24-48 अशा प्रकारे अंक घेऊन त्यात चार मिळवून त्याचा दहाने भागाकार केल्यावर येणारं उत्तर अशा स्वरूपाचं होतं. त्यात मंगळ आणि गुरू यांच्यात असलेल्या ‘24’ या जागी काहीच दिसत नव्हतं. मंगळ 12 तर गुरू 48 मग या रिकाम्या जागी काय असावं. कारण हर्षलने शोधलेला नेपच्यूनसुद्धा टायटस-बोड यांच्या नियमात बसत होता. तर मंगळ-गुरूमधला ‘ग्रह’ कुठे गहाळ झाला? त्याचं उत्तर 1 जानेवारी 1801 रोजी ग्युसेपी फियाझी याने दिलं. या संशोधकाला त्या मधल्या मंगळ-गुरूमधील ‘गॅप’मध्ये सेरेस नावाचा लघुग्रह सापडला आणि टायटस-बोड नियमाला पुष्टी मिळाली. नंतर याच लघुग्रह पट्टय़ातले व्हेस्टो, पेलास, हायजिया हे लघुग्रहसुद्धा सापडले.
गुरूच्या प्रचंड गुरुत्वाकर्षणापुढे या लघुग्रहांच्या पट्टय़ातील 99 टक्के द्रव्य अल्पावधी वर्षांत विखरून गेलं आहे. सध्या त्यात आपल्या चंद्राच्या 47 टक्के इतकंच वस्तुमान आढळतं. त्यापैकी चार लघुग्रहांत केवळ 940 किलोमीटर व्यासाचा ‘सेरेस’ महत्त्वाचा. कारण हर्शलच्या नावे अवकाशात गेलेल्या इफ्रारेड लॅबने ‘सेरेस’वर पाण्याची वाफ असल्याची नोंद केली. त्यामुळे प्लुटोआधीच्या एकूण ग्रहमालेतल्या या एकमेव लघुग्रहाला खूप महत्त्व आलं.
संशोधकांना सुरुवातीला धुमकेतूसारखा वाटणारा आणि दुर्बिणीतूनही चकतीसारखा दिसण्याइतपत आकार असलेला ‘सेरेस’ पाण्याची वाफ बाळगून असेल तर अवकाश पादाक्रांत करणाऱया माणसांच्या दृष्टीने चांगलीच बातमी. पुढच्या काळात या लघुग्रहांचं अधिक संशोधन होईल. एखादं यानही त्यावर उतरेल आणि सूर्यमालेतील अनेक गूढ वाटणाऱया गोष्टींचा उलगडा अभ्यासातून होतच राहील.