बोरिवली, दहिसर, मागाठाणेतील रस्ते, पुलांच्या कामांना गती मिळणार
बोरिवली, दहिसर, मागाठाणेमधील रस्ते, पुलांच्या कामांना आता गती मिळणार आहे. अनेक रस्ते-पूल निधी व प्रकल्प मंजुरी मिळाली नसल्याने दोन वर्षांपासून रखडले आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. याबाबत विभागातील शिवसेना आमदार-नगरसेवकांनी अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांच्यासोबत ऑनलाइन बैठक घेतली. यावेळी सर्व कामे लवकरात लवकर सुरू करण्यात येतील असे आश्वासन अतिरिक्त आयुक्तांनी शिवसेनेला दिले.
बोरिवली, दहिसर आणि मागाठाणे विभागातील समस्या तातडीने सोडवाव्यात यासाठी विभागप्रमुख आमदार विलास पोतनीस, आमदार प्रकाश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली पालिकेच्या आर – उत्तर व आर – मध्य विभागातील नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्तांशी ऑनलाइन बैठक घेतली. शिवाय शिष्टमंडळाने निवेदनही दिले. यावेळी शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी, विधी समिती अध्यक्ष हर्षद कारकर, प्रभाग समिती अध्यक्षा सुजाता पाटेकर, नगरसेविक तेजस्वी घोसाळकर, बाळकृष्ण ब्रीद, संजय घाडी, शीतल म्हात्रे, रिद्धी खुरसंगे, गीता सिंघण, माधुरी भोईर आदी उपस्थित होते.