Header

मुद्दा – निरोगी दीर्घायुष्याची संजीवनी समृद्ध निसर्गातच!

मुद्दा – निरोगी दीर्घायुष्याची संजीवनी समृद्ध निसर्गातच!

human-nature

>> अजित कवटकर

अनिश्चितता, असह्यता, संभ्रम, भीती, मानसिक ताण आणि नकारात्मकतेच्या अनेक कारकांचा प्रादुर्भाव या कोरोना संक्रमणाच्या आधाराने होत असल्याचे दिसत आहे. जगातील सगळेच, हे थोडय़ा-फार प्रमाणात ही स्थिती अनुभवत आहेत. या रोगावर निर्णायक परिणाम करणारे औषध निर्माण होईपर्यंत, प्रत्येकाची रोगप्रतिकारक क्षमता त्यादृष्टीने संपूर्ण विकसित होईपर्यंत किंवा या विषाणूंचा प्रादुर्भाव हा नैसर्गिकरीत्या पूर्णपणे संपुष्टात येईपर्यंत तरी, काळजीतून उद्भवणाऱया विकारांनी अनेकजण ग्रासले जाणे, हेदेखील नैसर्गिक वा स्वाभाविकच असणार आहे. मानसिक स्वास्थ्याला यातूनही आराम मिळावा, यासाठी निसर्गाने निसर्गातच सुंदर तरतूद करून ठेवलेली आहे. निसर्ग, नैसर्गिक पर्यावरणाचे आरामदायी, स्वस्थकारक, आरोग्यदायी परिणाम हे निर्विवाद आहेत. त्यातूनच नेचर थेरपीला वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्राप्त झालेली विश्वासार्हता व मिळालेली स्वीकृती ही नक्कीच आशावादी आहे. महामारी आपत्तीच्या या चिंतातुर वातावरणातून स्वतःला विलग करून, जिवनाला जिवंतपणाचा तो आनंददायी विश्वास प्राप्त करून देण्यासाठी निसर्गाच्या कवेत जाऊन काही क्षणांसाठी स्वतःला विसरणे अपरिहार्य आहे. हा निसर्गोपचार आपल्या शरीर, मनाला नक्कीच एक जीवन संजीवनी देण्याची शक्ती बाळगतो.

आजारपणातून बाहेर येताच, काही दिवसांसाठी कुठेतरी हवापालट करण्यासाठी जाण्याचा सल्ला डॉक्टर हमखास आपल्या पेशंटना अगोदर द्यायचे. गर्द हिरवळीने संपन्न असलेल्या निसर्गाच्या सान्निध्यात, मनुष्य गर्दीपासून दूर वन्यजिवांच्या नैसर्गिक आधिवासात काही दिवस घालवण्याने आजारपणामुळे कमी झालेली शारीरिक शक्ती आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे मनावर चढलेला निराशेचा मळभ दूर होऊन, जगण्याच्या त्याच उत्साही व सकारात्मक इच्छाशक्तीचा शरीर-मनात पुनः संचार होण्यास मदत होई. वनांतील शुद्ध हवा, मंत्रमुग्ध करणारे वातावरण, वैचारिक कल्लोळ शांत करणारी निरवता, मनाला प्रसन्न करणारे रंग-सौंदर्य, पक्ष्यांचा मधुर किलबिलाट, खळखळून वाहणारा तो नदीचा संगीतमय प्रवाह, फळा-फुलांचा तो मन मोहून टाकणारा सुगंध, हवेतील आल्हाददायक गारवा, मातीच्या व गवताच्या स्पर्शाने रोमांचित होणारे शरीर, प्रत्येक इंद्रियाला प्रफुल्लित करणारा तो स्वर्गीय निसर्ग म्हणूनच एक सर्वोत्तम वैद्य होय.

जीवनाला लाभलेल्या सर्व छान, स्वास्थ्यवर्धक गोष्टी या निसर्गापासून मानवाला प्राप्त झाल्या आहेत. वेद, योग, संस्कार, संस्कृती, संगीत, कला, विज्ञान वगैरे या सर्वांचे प्रेरणास्रोत हा सुंदर, संपन्न निसर्ग आहे. जीवनाची अत्यावश्यकता असलेल्या बहुतेक घटकांचे उगमस्थान येथेच. इथून उत्सर्जित होणारा बहुतांश प्राणवायू जगाचा श्वास भरतो. इथे सुरक्षित असलेली जैवविविधता परस्परावलंबनातून आपल्या वसुंधरेला शाश्वत बनवत आहे. मानवी जीवनातील कंटाळवाणा एकसुरीपणा घालवणाऱया वन्य प्राणी-पक्षांच्या आनंदी वास्तव्याचे संवर्धन करणारे हे वन, अप्रत्यक्षपणे आनंदाची वेगवेगळी रूपं आपल्याकरिता संवर्धन, संगोपन करतात. एकूणच काय, मनुष्याच्या चांगल्या आरोग्यासाठी ही वनस्पतीसृष्टी, ही वन्यजीवसंपदा टिकवणे, वाढवणे, संरक्षित ठेवणे आपली जबाबदारी आहे. तिची समृद्धी हीच आपल्या निरोगी जीवनाचा आधार असणार आहे.

निसर्गात स्वतःला हरवून, विसरून जाण्यातला अत्यानंद हा अनेक प्रकारे आरोग्याला पोषक ठरत असतो. आणि म्हणूनच या सात्विकतेशी अनेक प्रकारे एकरूप होण्याच्या संधीचा लाभ घेता येणे शक्य असल्यास, तो जरूर घ्यावा. या सुंदर पृथ्वीला अधिक सुंदर बनविण्यासाठी वृक्षारोपणाहून अधिक उदात्त ते काय! एखाद्या रोपटय़ाला रुजवणं, वाढवणं यात एका वेगळ्याच आत्मिक समाधानाची प्राप्ती होते. प्रभातसमयी रानावनातून हिंडण्याचा ’नेचर वॉक’ हा विचार-मनातील सगळी नकारात्मकता नष्ट करण्याची किमया करतो. जंगल ’ट्रेकिंग’ करण्याने शरीराला ऊर्जा आणि मनाला आत्मविश्वास लाभतो. पक्षी निरीक्षण व वन्यजीव छायाचित्रण आपल्यासमोर एक अद्भूत व रहस्यमय जग उलगडत असतं. हे करत असताना आपल्याला आपल्याच चिंता व दुःखांचा पडणारा विसर, मन शांत व विचार सृजनशील बनतात. वन्य आधिवासात केल्या जाणाऱया ध्यान-चिंतनाचा शरीर-मनावर होणारा स्पर्श परमोच्च सुखाची अनुभूती देतो. एखाद्या पशु-पक्ष्याचे पालकत्व स्वीकारून त्याच्या संगोपनात मिळणारा निःस्वार्थ आनंद आपल्या स्वतःमध्येच अनेक चांगले गुण रुजवत असतो. वनस्पतींच्या विविध जातींचा अभ्यास करणे किंवा रोजच्या रोज त्यात होत असलेल्या वाढीचे निरीक्षण करण्यातदेखील स्वतःला निसर्गाशी एकजीव करण्यासारखे आहे.

मनुष्याची कमकुवत होत चाललेली रोगप्रतिकारकशक्ती ही त्याला नवनवीन रोगांसमोर किती हतबल, असह्य करू शकते, हे या कोरोना महामारीने दाखवून दिले आहे. आपण निसर्गापासून स्वतःला दूर करत गेलो, नैसर्गिकतेला अव्हेरू लागलो याचेच बहुदा हे परिणाम असावेत. आपल्या निरोगी दीर्घायुष्याची संजीवनी या निसर्गातच आहे. हा निसर्ग, ही वन्यजीवसृष्टी अधिक समृद्ध, स्वच्छ, सुंदर होणे आपल्याच हिताचे आहे. शुद्ध निसर्गाच्या सहवासात लाभणारा निर्मळ विचाररूपी जीवनरस हा मनुष्याला अनेक आजार व विकारांपासून आराम देण्याची शक्ती बाळगतो. आपल्याला याचे आशीर्वाद तेव्हाच प्राप्त करणे शक्य होणार जेव्हा आपण निसर्गाचा आदर करणार, त्याची सर्वश्रेष्ठता मान्य करून त्यात नुकसानकारक हस्तक्षेप करण्याचे जाणीवपूर्वक टाळणार, भक्तिमनाने त्याचे सौंदर्य, सात्विकता टिकविण्याचा, वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करणार. मग असा हा निरोगी निसर्ग आपल्या आरोग्याची, स्वास्थ्याची नक्कीच काळजी घेणार.

ajit.kavatkar@gmail.com



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article