दहावेळा ‘झीरो पेशंट’, एकही कंटेन्मेंट झोन नाही; ‘धारावी मॉडेल’ची कोरोनाला दुसऱयांदा फाईट!
>> देवेंद्र भगत
कोरोना रोखण्याच्या कामगिरीमध्ये केवळ मुंबई-महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगात डंका गाजलेल्या पालिकेच्या ‘धारावी मॉडेल’ने कोरोनाला दुसऱयांदा जोरदार फाईट देत कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. दुसरी लाटही आता पूर्ण नियंत्रणात आली असून एकही कंटेन्मेंट झोन नसल्याने दाटीवाटीच्या झोपडपट्टीने ‘मोकळा श्वास’ घेतला आहे. धारावीत डिसेंबरपासून आतापर्यंत तब्बल दहा वेळा ‘झीरो पेशंट’चा आकडा समोर आला असून रुग्णच नसल्याने सर्व कोविड क्वारंटाईन सेंटरही बंद करण्यात आली आहेत. या यशाबाबत ‘जी/उत्तर’चे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांच्याशी केलेली बातचीत.
n धारावीत दुसरी लाट कशी थोपवली?
– आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या आणि तब्बल सहा लाख लोकसंख्या असलेल्या धारावीत दुसऱया लाटेतही रुग्ण वाढू लागल्याने आव्हान वाढले होते. प्रचंड दाटीवाटीच्या भागात सोशल डिस्टन्सिंग राखणेही आव्हान होते. मात्र घरोघरी स्क्रिनिंग, प्रत्येक बाधित रुग्णामागे 25 जणांची चाचणी, पॉझिटिव्ह आढळणाऱयांबाबत खबरदारी बाळगून आवश्यक उपचार केल्यामुळेच रुग्णसंख्या घटली. यामध्ये ‘मोबाईल टेस्टिंग व्हॅन’ उपक्रमाचा मोठा फायदा झाला.
n रुग्णसंख्या घटण्यासाठी कोणते उपाय प्रभावी ठरले?
– कोरोनाच्या पहिल्या लाटेपासूनच नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी अनेक उपक्रम राबवल्यामुळे रहिवासी स्वतःहून खबरदारी घेतच आहेत. शिवाय सार्वजनिक ठिकाणे, शौचालये यांचे पालिकेच्या माध्यमातून वारंवार सॅनिटायझेशन केल्यामुळे रुग्णसंख्या घटण्यास मदत झाली. या भागात दररोज 100 ते 150 चाचण्या करून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. विशेष म्हणचे या चाचण्या नियमितपणे सुरू आहेत. ट्रेसिंग, टेस्टिंग, ट्रकिंग आणि ट्रिटिंग अशा चतुःसूत्रीनुसार काम केल्यानेचे हे यश मिळाले.
n संभाव्य तिसऱया लाटेसाठी कसे नियोजन आहे?
– धारावीने कोरोनाच्या दोन लाटांचा सामना करून या दोन्ही लाटांवर यशस्वीरीत्या मात केली आहे. धारावीत आतापर्यंत 6890 रुग्ण आढळले असले तरी यातील 6515 जणांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. धारावीत आता केवळ 16 सक्रिय रुग्ण आहेत. तिसरी लाट येऊच नये अशी अपेक्षा आहे. मात्र तिसऱया लाटेत मुलांना सर्वाधिक धोका असल्याचा इशारा देण्यात आल्यामुळे पोलिओ लसीकरणाच्या आकडेवारीनुसार सतर्कता बाळगण्यात येत आहे. पालिकेची यंत्रणा सज्ज आणि सक्षम आहे!
n आगामी सण-उत्सवांमध्ये कशी खबरदारी घेणार?
– मुंबईत कोरोना आता पूर्ण नियंत्रणात आला असला तरी तिसऱया लाटेचा धोका आरोग्य तज्ञांनी वर्तवल्यामुळे सर्वांनीच खबरदारी घेणे गरजेचे आहे. 6 लाख लोकसंख्येच्या धारावीत उपलब्ध होणाऱया डोसच्या संख्येनुसार केवळ 27 हजार जणांचेच लसीकरण झाले आहे. त्यामुळे आगामी सण-उत्सव गेल्या वर्षीप्रमाणेच संयमाने आणि सर्व प्रकारच्या आवश्यक खबरदारी घेऊनच गर्दी टाळून करावे लागतील. यासाठी यावर्षीही नागरिकांचे सहकार्य मिळेल अशी अपेक्षा आहे.