दिलीपकुमार पुन्हा रुग्णालयात
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना मंगळवारी सकाळी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. 92 वर्षीय दिलीपकुमार यांना श्वसनाचा त्रास जाणवत असल्याने त्यांना महिनाभरात दुसऱयांदा उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर असून आयसीयूमध्ये त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
दिलीप कुमार यांना श्वसनाशी संबंधित त्रास पुन्हा जाणवू लागला आहे. त्यामुळे त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार करण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. त्यांच्यावर सतत लक्ष ठेवता यावे यासाठी आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती रुग्णालयीन सूत्रांनी दिली. याआधी 6 जून रोजी श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पाच दिवसांच्या उपचारानंतर त्यांना 11 जून रोजी डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी चाहत्यांकडून प्रार्थना केल्या जात आहेत.