तुकोबांच्या पादुकांचे आज आषाढी वारीसाठी प्रस्थान
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या 336 व्या पालखी सोहळ्य़ासाठी चलपादुकांचे गुरुवारी आषाढी वारीसाठी परंपरेनुसार विधिवत प्रस्थान होणार आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पालखी सोहळा शंभर वारकऱयांच्या उपस्थितीत होणार असला तरी परंपरेनुसार होणाऱया सोहळ्याची जय्यत तयारी संत तुकाराम महाराज संस्थानने केली आहे. यंदा प्रस्थान झाल्यानंतर पादुका देऊळवाडय़ातच ठेवण्यात येणार आहेत. वारीच्या वाटेवर होणारी कीर्तन, जागर कार्यक्रम देऊळवाडय़ातच होणार आहेत. तर, आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे 19 जुलै रोजी पादुका एसटी बसने श्रीक्षेत्र पंढरपूरला रवाना होतील.
आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराजांच्या पादुका गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा पायी वारी सोहळा रद्द करण्यात आल्याने प्रस्थान झाल्यानंतर चलपादुका 1 जुलै ते 18 जुलै या कालावधीत देहूतील मुख्य मंदिरात राहणार आहेत. या कालावधीत देऊळवाडय़ात मोजक्याच लोकांना प्रवेश देण्यात येणार आहे. 18 जुलैपर्यंत वारीच्या वाटेवर दररोज पंरपरेनुसार होणारे धार्मिक कार्यक्रम साध्या पध्दतीने देऊळवाडय़ात होणार आहेत. त्यासाठी प्रवचनकार, कीर्तनकार, पालखीचे मानकरी, सेवेकरी, टाळकरी, मचलेकर दिंडीवाले यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
श्री संत तुकाराम महाराज मंदिर आणि परिसराचे दर तीन तासांनी निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. देऊळवाडय़ाला आणि मंदिराला फुलांची सजावट करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अब्दागिरी, गरुडटक्के, पादुका यांना झळाळी देण्यात आली आहे. चांदीचा रथ जागेवरच राहणार असून, रथालाही झळाळी देण्यात आली आहे. सोमवारपासून देहू आणि पंचक्रोशीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मुख्य मंदिरात परवानगीशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.
19 जुलै रोजी पादुका एसटीबसने श्रीक्षेत्र पंढरपूरला रवाना होणार
गुरुवारी पहाटे चार वाजता विठ्ठल रुक्मिणी मंदिरात काकड आरती आणि अभिषेक महापूजा होईल. साडेचार वाजता श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात महापूजा, पाच वाजता वैंपुंठगमन मंदिरातील महापूजा, सकाळी सहा वाजता पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज यांच्या समाधीची पूजा, नऊ वाजता सेवेकरी म्हसलेकर मंडळी श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका डोक्यावर घेऊन भजनी मंडपात आणतील. दहा वाजता श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने पालखी प्रस्थान सोहळ्यापूर्वी आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनाने होईल.
परवानगी असलेल्या पालख्यांनाच प्रवेश
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यशासनाने वारकरी सांप्रदायाची परंपरा कायम ठेवून पालखी सोहळ्याचे नियोजन केले आहे. ज्या पालखी सोहळ्यांना शासनाने परवानगी दिली आहे त्यांनाच पंढरपुरात प्रवेश देण्यात येणार आहे. इतर कोणत्याही पालखी, दिंडी तसेच वारकरी व भाविकांनी आषाढी वारी कालावधीत पंढरपुरात येऊ नये, असे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले.