तिवरे धरणग्रस्तांसाठीच्या 24 घरांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण; उर्वरित घरांसाठी 7 कोटींचा निधी देणार
तिवरे धरणग्रस्तांसाठी सिद्धिविनायक न्यासाने दिलेल्या 5 कोटी रुपयांच्या निधीतून बांधलेल्या 24 घरांचे आज लोकार्पण होत आहे. त्यांना हक्काचा निवारा मिळत आहे याचे समाधान आहे. यातील उर्वरित धरणग्रस्तांनाही एक वर्षाच्या आत घरे देण्यासाठी लागणाऱया 7 कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव व आराखडा तातडीने पाठवावा, हा निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिली.
रत्नागिरी जिह्यातील तिवरे धरण दुर्घटनाग्रस्तांसाठी चिपळूण तालुक्यातील अलोरे येथे सिद्धिविनायक न्यासाच्या निधीतून घरे बांधण्यात आली आहेत. त्याचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज दूरदृश्यप्रणालीद्वारे करण्यात आले. या कार्यक्रमाला परिवहनमंत्री तथा पालकमंत्री अॅड. अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर, खासदार विनायक राऊत, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, आमदार भास्कर जाधव, शेखर निकम, मुख्य सचिव सीताराम पुंटे, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा व इतर मान्यवर उपस्थित होते.
तिवरे धरणग्रस्तांना नवीन घरे देताना आजूबाजूच्या परिसरात पुन्हा अशा घटना घडण्याची शक्यता नाही याची काळजी घेण्याच्या सूचना देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, निसर्गाची ताकद मोठी आहे. निसर्ग लहरी होत आहे. अनियंत्रित, अनियमित पावसामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता असते हे लक्षात घेऊन राज्यभरात अशा प्रकारे घटना घडू नयेत यासाठी सावधगिरी बाळगण्याच्या सूचना आपण दिल्या आहेत. वित्तहानी भरून काढता येते, परंतु मनुष्यहानी ही न भरून येणारी असते. त्यामुळे एकही जीव जाऊ न देणे याला आपले पहिले प्राधान्य असल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
कार्यक्रमात खासदार विनायक राऊत, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, सिद्धिविनायक न्यासाचे आदेश बांदेकर यांच्यासह इतर उपस्थित काही मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यात त्यांनी तिवरे दुर्घटना, नागरिकांना पुन्हा उभे करण्यासाठी करण्यात आलेले सामूहिक व प्रशासकीय पातळीवरचे प्रयत्न आणि इतर बाबींचा आढावा घेतला.