वीज बिल भरल्याशिवाय वीज दुरुस्ती करणार नाही, वीज वितरण कंपनीचा सुलतानी निर्णय
जनतेसाठी अत्यावश्यक सेवा म्हणून समावेश असलेला वीज पुरवठा पावसाळ्याच्या दिवसात नादुरुस्त होण्याचे प्रमाण अधिक असताना वीज वितरण कंपनीने जनतेच्या याच असहायतेचा गैरफायदा घेत जोपर्यंत चालू महिन्याचे वीज बिल भरणार नाही तो पर्यंत ग्राहकांची तक्रार स्वीकारणार नाही म्हणजे वीज दुरुस्ती केली जाणार नाही अशी सुलतानी भुमिका घेतली आहे. कोरोनाच्या आर्थिक संकटात नागरिकांना वीजेच्या समस्येसोबतच आता वीज बिल भरण्यासाठी पैशांची जमवाजमवीचे असे दुहेरी संकट कोसळले आहे. चंद्रपुरातील बंगाली कॅम्प येथील वीज कंपनीच्या ग्राहक तक्रार केंद्राच्या अनाठायी भुमिकेमुळे वीज ग्राहकांवर अंधारात राहण्याची वेळ आली आहे.
अत्यावश्यक सेवा असताना देखील वीज कंपनीचे कर्मचारी जनतेला अत्यावश्यक सेवेपासून वंचित ठेवण्याच्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये वीज वितरण कंपनीविरोधात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने वीज नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. वीजेची समस्या निर्माण झाल्याने नागरिकांच्या तक्रारी देखील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात वाढल्या आहे. यामुळे सध्या वीज वितरण कंपनीच्या ऑनलाईन केंद्रावर तसेच कार्यालयात वीज बंद झाल्याच्या तक्रारी घेऊन नागरीक जाऊ लागले आहे. मात्र आपली तक्रार घेऊन मोठ्या आशेने येणार्या ग्राहकांना वीज वितरण कंपनीच्या कर्मचार्यांच्या उर्मटपणामुळे निराश व्हावे लागत आहे. वीज कंपनीचे कर्मचारी तक्रार करणार्या नागरिकांना आधी चालू महिन्याचे वीज देयक दाखवा नाही तर अगोदर वीज बिल भरा नंतरच तुमची तक्रार घेण्यात येईल. वीज बिल भरल्याशिवाय वीज कंपनीचे कर्मचारी वीज दुरुस्त करायला येणार नाही असे बजावून सांगत आहे. कोरोना काळात शासन जनतेला विविध सुविधा देत असताना वीज वितरण कंपनी मात्र जनतेकडून वीज बिलाच्या वसुलीचा सपाटा लावला आहे. कोरोनाने अगोदरच व्यवसाय बंद पडले आहे. बँकाचे ईएमआय, विविध देणे थकीत आहे. शासन व्याज माफी, सवलत अशा सुविधा एकीकडे देत असताना शासनाचाच एक भाग असलेले वीज वितरण कंपनी मात्र परस्परविरोधी भुमिका घेत असल्याने नागरिकांमध्ये चीड निर्माण झाली आहे. वीज बिलाच्या सक्ती बाबत अधिक्षक अभियंता संध्या चिवंडे यांना विचारणा केली असता त्या म्हणाल्या, ग्राहकांना वीज भरणे गरजेचे आहे. मात्र वीज दुरुस्तीच्या तक्रारीसाठी वीज देयक भरण्याची सक्ती नाही. ग्राहकांचे थकीत बिल भरण्यासाठी कंपनीकडून सांगीतले जाते. वीज दुरुस्तीसाठी वीज बिल भरण्याची पावती दाखविण्याची गरज नाही.