Header

मुखवटे सोलताना – निसर्गाला जपा, निसर्ग तुम्हाला जपेल

मुखवटे सोलताना – निसर्गाला जपा, निसर्ग तुम्हाला जपेल

human-nature

>> मलिका अमरशेख  

प्रिव्हेंशन बेटर दॅन क्युअर या कोरोना काळात हा मंत्र खूपच उपयोगाचा ठरला. निसर्गाला न् पर्यावरणाला पण हाच मंत्र लागू पडतो. आपण निसर्गाला पर्यावरणाला आजारी पाडलेय. त्याने आपलं आणखी वाईट करण्याऐवजी त्याचा उपचार करून त्याची काळजी घ्या. जंगलप्राणी, पशुपक्षी, समुद्री जीवन हे चराचरहे पर्यावरण समजूतदार, तोल सांभाळणारं. यामुळे आपण जिवंत आहोत हे कधी समजणार आपल्याला? निसर्गाला तुम्ही जपलंत तरच निसर्ग तुम्हाला जपेल.

आपल्याकडे काय ग्रेटा थुनबर्ग नाहीय, याचा अर्थ असा नाहीय की पर्यावरणाशी काहीही घेणंदेणं नाही.

खरं तर हिंदुस्थानमध्ये प्रत्येक प्रांतामध्ये माणसांचं-संस्कृतीचं-भाषेचं-राहणीमान-रीतीरिवाजांचं जे वैविध्य आहे तितकंच वैविध्य व समृद्धी निसर्गाचीही आहे. दुर्दैवानं आपण तिची जोपासना तर सोडाच, तिची उधळपट्टी, दुर्लक्ष, ऱहासच करतोय.

जंगल न् सागर… हिंदुस्थानमधल्या प्रत्येक प्रांतात जंगल न विविध प्रजातीची जनावरं, पशुपक्षी आहेत; तर हिंदुस्थानला ज्या तिन्ही बाजूंनी वेढलंय त्या तीन सागरांत प्रचंड प्रमाणात जलचर संपत्ती आहे. पर्यटक म्हणून लोक जातात. पाणबुडय़ाचा वेश परिधान करून मस्त जलसृष्टीची सफर करून येतात न् मस्त घरी परत जातात.

9 जुलै 2020 रोजी आयू सीएननं राइट व्हेल या महाकाय सस्तन जलचरास ‘अतिगंभीर’ प्रजातीच्या यादीत टाकलंय. पण हे झालं खोल जलस्तरातलं. जरा कमी समुद्रतळ असलेल्या ठिकाणी पण अनेक मासे, कासवं जहाजांचे दोरखंड, चक्रपाती आणि कोळय़ांची जाळी यात अडकून जखमी होतात किंवा मृत होतात. जहाजांचे अपघात झाले तर त्यातून पसरणारं तेल-वंगण याने तर अनेक कोटय़वधी मासे मरण पावतातच, पण पाण्यात प्रचंड प्रमाणात प्रदूषण होऊन जलवनस्पती व जलचर दोनही मृत होतात. औद्योगिक कचरा, ज्यात रसायनं असतात, माणसं जो कचरा टाकतात त्यातल्या प्लॅस्टिक पिशव्या कासव, मासे खातात. प्लॅस्टिकचं विघटन होत नाही. त्यानेही ते मरतात.

समुद्रात भराव टाकला जातो. अरण्यात जंगल, टेकडय़ा खंदून, तोडून रस्ते, पूल, इमारती केल्या उभारल्या जातात.

या सर्वांचा परिणाम भयावह आहे हे लक्षात का येत नाही? आताच मान्सूनचं गणित साफ कोसळलंय. बिबटय़ा, वाघ आपल्या क्षेत्रात येत नाही. आपण त्यांच्या क्षेत्रावर अतिक्रमण केलंय. वन्यजीव हे जंगलातल्या पर्यावरणाची साखळी आहे. तर समुद्र हा एक शांत बसलेला गहन, तेजस्वी पण शक्ती असलेला तपस्वी आहे. त्याला छेडू नका. जंगल आपल्याला खूप काही देतोय. समुद्रही देतो म्हणून ऊतमात करू नका.

हत्तीसुळे, व्याघ्रनख, अस्वलांची नखं, चामडं, सापाची कात, कासवांची तस्करी… किती नष्ट करणार आपण आपला उपयुक्त ठेवा? आज तरी जंगल शांत आहे. समुद्र शांत आहे. त्यांची शांतता आपल्या शांततेशी नाजूक पण मजबूत दुवा बांधून आहे. आई न् गर्भातलं मूल नाळेवाटे अन्नग्रहण करतं. तिळातिळाने वाढणारं मूल न् जंगल व समुद्रावर जगणारे आपण काहीच फरक नाहीय.

जंगल-प्राणी, पशुपक्षी, समुद्री जीवन हे चराचर-हे पर्यावरण समजूतदार, तोल सांभाळणारं. यामुळे आपण जिवंत आहोत हे कधी समजणार आपल्याला?

आपण जंगलातला अधिवास त्यांचा त्यांना परत करूयात; पण आणखी संरक्षित अधिवास उत्पन्न करून देण्याची जबाबदारी पण पार पाडूयात की.

आपण सागरी अधिवास निर्माण करू शकतो. आपण रस्त्यांसाठी समुद्राला हटवतो. का आपण समुद्रांतर्गत जलचर सृष्टी उभारत नाही? वर जलपर्यटन, खाली जलविहार, एका निश्चित मर्यादेपर्यंतचा समुद्रभाग हा फक्त राखीव असेल. त्यात सर्व तऱहेच्या मत्स्य प्रकारांना, कासवांना संरक्षण असेल. शासनातर्फे दर महिन्याला त्याचा सर्व्हे करण्यात यावा. तर अभ्यासक, विद्याथी व विशेष तज्ञ यांना या सर्वांचा अभ्यास व विकास करण्यासाठी एक निश्चित शिष्यवृत्ती, अभ्यासवेतन मिळावे, जेणेकरून जलजैवसृष्टीची माहिती जतन व विकास एकाच वेळी साधला जाईलच; पण त्याचबरोबर नव्या पिढीला, विद्यार्थ्यांना पर्यावरणाचं, जलजैवसृष्टीचे महत्त्व व माहिती कळेल आणि त्याच्या वाढीसाठी, संगोपनासाठी काय काय करावं याच्या नव्या नव्या योजनाही नवी पिढी देईल व राबवेल.

राणीचा बाग, संजय गांधी अभयारण्य असं आपण प्रत्येक जिल्हय़ात उभारू शकतोच की. जेणेकरून बिबटय़ा, वाघ, हत्ती हे गावात, शेतात शिरून पिकं, गुरं आणि माणसांवर हल्ला करणार नाहीत. वन विभागाची व्याप्ती वाढेल. लोकांना काम मिळेल. शेतकऱयांना या योजनेत सामील करावं. ते आनंदी होतील. शेत, गुरे व कुटुंब यांचं संरक्षण करता येईल. त्याबद्दल त्यांना मोबदला दिल्यास त्यांना पर्यायी रोजगार मिळेल. गारपीट झाली, अवर्षण झालं तरी रोजीरोटी चालू राहील व शेतकऱयांवर मृत्यूची वेळ येणार नाही.

तसंच प्रत्येक गावागावात पाण्यासाठी छोटेमोठे तलाव बांधून त्यात पावसाचं पाणी राहिल्यास दुष्काळ पडला तरी शेतीला पाणी मिळेल. प्रत्येक गावात प्रत्येक सरपंचाने घरटी एक झाड त्या घराच्या समोर लावायची सक्ती करावी, त्याची देखभाल त्यानेच करावी. त्याबद्दल त्याची फळं त्याने घ्यावी व काही फळं पंचायतीत जमा करावी.

वाळू, दगड, माती यांची चोरी, जनावरं व कासव यांच्या तस्करीला जबरी दंड किंवा शिक्षा ताबडतोब अमलात आणावी.

पवई, विहार लेक याप्रमाणे जिथे मोठमोठे जलाशय आहेत त्याजवळ एक मोठा जलाशय बंदिस्त करून त्यात सर्व तऱहेचे मासे, जलचर  सोडावेत. हे अगदी गावागावात करता येईल. ‘गरज ही शोधाची जननी’ अशी म्हण आहे. पण आपल्याकडे सगळं उलटंच आहे. गरज न् संकट असली तरी आम्ही ढिम्म असतो. सगळे रामभरोसे किंवा सरकारभरोसे… असं तर बरोबर नाही. आसाममधला एक माणूस पूर्ण जंगल उभारतो; मग आपण सगळे मिळून जंगल, समुद्र पूर्ण पर्यावरण पूर्ववत सुंदर परिपूर्ण व समतोल करू शकतो.

डॉक्टरी परिभाषेत एक वाक्य आहे, ‘प्रिव्हेंशन बेटर दॅन क्युअर’ ‘आजारी पडून बरे होण्याऐवजी काळजी घ्या!’ आता या कोरोना काळात हा मंत्र खूपच उपयोगाचा आहेच. पण निसर्गाला न् पर्यावरणाला पण हाच मंत्र लागू पडतो. आता आपण निसर्गाला व पर्यावरणाला आजारी पाडलेय. त्याने आपल्याला आणखी वाईट करण्याऐवजी त्याचा उपचार करून त्याची काळजी घ्या. निसर्गाला न् जैवसृष्टीला तुमच्या जोपासनेचं, काळजीचं, संरक्षणाचं व्हेंटिलेटर लावा. पाहा, निसर्ग न् पर्यावरण तुम्हाला गर्भातल्या बाळापेक्षा जास्त सुरक्षा, सुख आणि आरोग्य देईल!

n malikaamarshaikh1234@gmail.com



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article