Header

उमेद – आदिवासी लोकभाषा संशोधन

उमेद – आदिवासी लोकभाषा संशोधन

aadivasi-6

>> ऋषिकेश खिलारे

आपल्या देशात जवळजवळ पंधराशे भाषा बोलणारे निरनिराळे जनसमूह आहेत. त्या प्रत्येकाची बोलीभाषा वेगळी आहे. भाषावार प्रांतरचनेची निर्मिती झाली तरी अध्ययन आणि अध्यापनाच्या त्रिस्तरीय आकृतीबंधात दुर्दैवाने आदिवासीबहुल आणि सीमावर्ती भागातील बांधवांच्या मातृभाषेचा विचार झालेला नाही. त्यामुळे शिक्षणाबाबत अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. त्याचा विचार करून ऋषिमेळा इंडिजीनस नॉलेज ऍण्ड सायंटिफिक एज्युकेशन म्हणजेच राईज फाऊंडेशन हे यासंदर्भात आदिवासी लोकभाषा संशोधन हे महत्त्वपूर्ण अभियान राबवित आहे. त्याविषयी…

हिंदुस्थानात जवळपास 1500 भाषा बोलणारे निरनिराळे समूह आहेत. काही भाषांना लिपी आहे, तर काही मौखिक परंपरेने जतन होत आहेत. मात्र तरीदेखील त्या दुर्लक्षित आहेत. इतकेच नव्हे, तर लिपी असलेल्या काही भाषा बोलणाऱयांची संख्या कमी असल्याने अशा भाषांकडे कालपरत्वे दुर्लक्ष होत गेले आहे.

पुढे स्वातंत्र्यानंतर भाषावार प्रांतरचनेच्या तत्त्वानुसार राज्यांची निर्मिती करण्यात आली. त्या त्या/ संबंधित राज्याच्या मुख्य भाषेतून पूर्वप्राथमिक व प्राथमिक शिक्षण देण्याचे धोरण ठेवण्यात आले. नवीन शिक्षण प्रणालीमध्येही पुन्हा मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. आजपर्यंतची पिढी ही त्रिस्तरीय आकृतिबंधाद्वारे शिक्षण घेत आली आहे. अध्ययन-अध्यापनाच्या या त्रिस्तरीय आकृतिबंधात मात्र दुर्दैवाने आपण आदिवासीबहुल व सीमावर्ती भागातील आपल्या बांधवांच्या मातृभाषेचा विचार केलेला नाही.

महाराष्ट्रापुरता विचार केला तर असे लक्षात येते की, भाषावार प्रांतरचनेमुळे मराठी ही महाराष्ट्राची मातृभाषा आहे, परंतु इतर राज्यांच्या सीमावर्ती भागातील व आदिवासीबहुल क्षेत्रातील महाराष्ट्रीयन लोकांची भाषा यामध्ये भाषा विसंवाद दिसून येतो. मातृभाषेतून शिकत असलेले मूल हे शालेय अभ्यासक्रम जास्त चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात. त्याचप्रमाणे मातृभाषा ही मुलांची वैयक्तिक, सामाजिक, सांस्कृतिक ओळख विकसित करण्यास मदत करत असते. कारण कोणत्याही समाजाच्या संस्कृतीचे जतन करण्याचे आणि ती पुढील पिढीकडे संक्रमित करण्याचे काम भाषा करत असते.

आपल्या हिंदुस्थानचा विचार केला, तर येथे 1500 भाषा बोलणारे निरनिराळे समूह आहेत. म्हणूनच स्वातंत्र्यानंतर भाषावार प्रांतरचनेची निर्मिती करण्यात आली. आजपर्यंतची पिढी ही त्रिस्तरीय आकृतिबंधाद्वारे शिक्षण घेत आली आहे. अध्ययन-अध्यापनाच्या या त्रिस्तरीय आकृतिबंधात मात्र दुर्दैवाने आपण आदिवासीबहुल व सीमावर्ती भागातील आपल्या बांधवांच्या मातृभाषेचा विचार केलेला नाही.

जसे की, मराठी ही महाराष्ट्राची मातृभाषा आहे, परंतु इतर राज्यांच्या सीमावर्ती भागातील व आदिवासीबहुल क्षेत्रातील महाराष्ट्रीयन लोकांची भाषा यामध्ये भाषा विसंवाद दिसून येतो. जेव्हा या प्रांतातील मूल शाळेत जाते, तेव्हा ते मराठी भाषेतून शिकण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असते. परिणामी भाषा हे संवादाचे मध्यम न ठरता ते शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील विसंवादाचे, किंबहुना संवादशून्यतेचे माध्यम ठरते. परिणामी शिक्षणाविषयीची अनास्था, उदासीनता वाढते. पुढे याचे पर्यवसान शाळेतील विद्यार्थ्यांच्या होणाऱया गळतीमध्ये दिसून येते.

या सर्व गोष्टी/समस्या लक्षात घेऊनच ऋषिमेळा इंडिजीनस नॉलेज अँड सायंटिफिक एज्युकेशन अर्थात राईज फाऊंडेशन हे सांस्कृतिक मूल्यावर आधारित मानव निर्मितीच्या उच्च ध्येयासाठी संशोधनात्मक अभियान राबवत आहे. सामाजिक कार्याला वैज्ञानिक अध्ययनाची जोड देऊन खऱया अर्थाने आदिवासी समस्यांवरचे कायमस्वरूपी निराकरण करण्याचा वसा आम्ही राईज फाऊंडेशनच्या माध्यमातून घेतला आहे.

याची सुरुवात ही महाराष्ट्रातील अतिदुर्गम आदिवासीबहुल क्षेत्र असलेल्या मेळघाटपासून केली आहे. या प्रांतातील कोरकू, गोंड, भिल्ल, पारधी, मोंगिया यांच्या भाषा व संस्कृती अभ्यास/अध्ययनास सुरुवात केली आहे. या अभ्यासातून असे लक्षात आले की, हिंदुस्थानी आदिवासी संस्कृतीचे जतन करायचे असेल तर त्या-त्या आदिवासी समाजाची भाषा ही महत्त्वपूर्ण आहे. या भाषांचे संवर्धन झाले तर संस्कृतीचे संवर्धन/ जतन होणे हे शक्य आहे.

ही मूलभूत गरज लक्षात घेऊन मूळ आदिवासी भाषांचा संग्रह करण्यासाठी ज्ञानकोशची निर्मिती करण्यात आली. याद्वारे ज्ञानाला सार्वत्रिक स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी सहायकाची भूमिका पार पाडणे हे राईज फाऊंडेशन आपले कर्तव्य समजते. म्हणूनच हजारो आदिवासी बांधवांच्या सहकार्यातून कोरकू भाषा संशोधन प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. यामुळे वीस हजार कोरकू शब्द शोधण्यात यश आले. कोरकू भाषेवर आधारित ज्ञानकोश हे राईजचे पहिले प्रकाशन असून त्यामध्ये 704 कोरकू शब्दांचा समावेश आहे. आज या ज्ञानकोशाच्या वापरामुळे मुलांची आकलन क्षमता वाढत आहे असा तेथील शिक्षकांचा अनुभव आहे. त्यांच्या मते शालेय शिक्षणातील भाषिक अडसर दूर झाल्याने मुले/ विद्यार्थी आनंदाने शिक्षण घेत आहेत. या ज्ञानकोशाच्या वापरामुळे विसंवादाकडून सुसंवादाकडचा हा प्रवास सकारात्मक बदल अधोरेखित करत आहे. ज्ञानकोशामुळे शिक्षणातील वाढती दरी कमी होऊन आदिवासी समाजाच्या भावी पिढय़ांची वाटचाल सुकर व्हावी यासाठीचा हा लोकभाषा संकलन, संस्करण, संशोधन व संवर्धनाचा हा सृजनात्मक प्रयत्न आम्ही करत आहोत.

– लोकभाषा, लोकसाहित्य, लोकसंगीत, लोकजीवन या सांस्कृतिक आविष्कारातून. हिंदुस्थानी आदिवासी लोकसंस्कृतीचा उदय झाला. या आदिवासी लोकसंस्कृतीचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करत तिला पुनरुज्जीवित करून तिचे संवर्धन करण्यासाठी राईज फाऊंडेशन नेहमीच प्रयत्नशील आहे. आदिवासी लोकभाषा संशोधन हे राईज फाऊंडेशनचे मूलभूत व महत्त्वपूर्ण अभियान आहे. यासाठी अभ्यासक, संशोधक, भाषा तज्ञ आणि स्थानिक जाणकार यांच्या सहभागातून पारंपरिक ज्ञान आणि संस्कृती आधारे मानवतावादी अस्तित्व विकसित करण्याचा प्रयत्न करत आहोत. जेणेकरून याद्वारे आदिवासी लोकभाषा, लोकसाहित्य, लोकगीते, लोकजीवन यांचे संवर्धन करण्यास आम्ही प्रयत्नशील आहोत.

(लेखक राईज फाऊंडेशन, मेळघाटचे संचालक आहेत)



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article