Header

मुंबईला तिसऱया लाटेचा धोका नाही, हर्ड इम्युनिटी डेव्हलप झाली

मुंबईला तिसऱया लाटेचा धोका नाही, हर्ड इम्युनिटी डेव्हलप झाली

corona

कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेकडून कोरोना चाचण्या आणि लसीकरणावर भर दिला जात असताना टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्चने (टीआयएफआर) दिलासादायक अहवाल जाहीर केला आहे. या अहवालात 80 टक्के मुंबईकरांना कोरोना होऊन गेला आहे. कोरोनामुक्त झालेल्या मुंबईकरांमध्ये हर्ड इम्युनिटी तयार झाली आहे. त्यामुळे कोरोनाच्या संभाव्य तिसऱया लाटेचा मुंबईला धोका नाही, असे टीआयएफआरने म्हटले आहे.

कोरोनाचा आतापर्यंत मुंबईकरांना झालेला संसर्ग आणि महापालिका-टीआयएफआर यासह केंद्रीय संस्थांकडून करण्यात आलेल्या सेरो सर्वेक्षणातून टीआयएफआरने हा निष्कर्ष अहवाल तयार केला आहे. मुंबईची लोकसंख्या 1 कोटी 30 लाख असून 1 फेब्रुवारीपर्यंत 65 टक्के मुंबईकरांना कोरोना होऊन गेला होता. मात्र, मुंबईइतकीच लोकसंख्या असलेल्या बंगळुरूमध्ये केवळ 45 टक्के लोकांना कोरोना होऊन गेला होता. तर 2 कोटी लोकसंख्या असलेल्या दिल्लीत मात्र या कालावधीपर्यंत 55 टक्के लोकांना कोरोना होऊन गेला होता. म्हणूनच दिल्ली आणि बंगळुरूच्या तुलनेत मुंबईला दुसऱया लाटेचा फटका कमी बसला, असे अहवालात म्हटले आहे.

टीआयएफआरच्या अहवालाबाबत मात्र महाराष्ट्र कोरोना टास्क पर्ह्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी वेगळे मत नोंदवले आहे. 80 टक्के मुंबईकरांना जर कोरोना होऊन गेला असेल आणि मुंबईकरांमध्ये जर हर्ड इम्युनिटी व अँटीबॉडीज तयार झाली असेल तर मुंबईत दररोज शेकडो रुग्ण का सापडत आहेत? मुंबईत आजही दररोज 600 ते 700 रुग्ण सापडत आहेत. याचे दोन अर्थ होतात. एक म्हणजे अँटीबॉडीज दोन प्रकारच्या असतात. यातील न्यूट्रिलाईज अँटीबॉडीज महत्त्वाची असते. त्यामुळे अहवालातील निष्कर्ष हा टोटल अँटीबॉडीजवर काढला की, न्यूट्रीलाईज अँटीबॉडीजवर काढला हे पाहिले पाहिजे. तर दुसरा म्हणजे ज्यांचा अभ्यास करण्यात आला केवळ अशाच लोकांमध्ये अँटीबॉडीज सापडल्या असाव्यात, पण सर्वसामान्यांमध्ये ही अँटीबॉडीज तयार झालेली नसावी, अशी शंका पंडित यांनी व्यक्त केली.

अहवालात काय आहे?

कोरोनाचा मुंबईत प्रवेश झाल्यापासून ते 1 जून 2021 पर्यंत 80 टक्के मुंबईकरांना कोरोना होऊन गेला आहे. त्यात 90 टक्के लोक हे झोपडपट्टय़ा, तर 70 टक्के लोक हे इमारतींमध्ये राहणारे आहेत.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत ज्यांना कोरोना होऊन गेला आहे, त्यांच्या अँटीबॉडीज आता कमी झाल्यामुळे त्यांना तिसऱया लाटेत पुन्हा कोरोना होऊ शकतो. मात्र, कोरोनाचा बदललेला विषाणू आणि लसीकरण किती वेगाने होत आहे यावर हा संसर्ग होईल की नाही ते अवलंबून आहे.

अहवाल सकारात्मक

कोरोनाच्या पहिल्या लाटेत मुंबईला इतर मोठय़ा शहरांच्या तुलनेत मोठा फटका बसला होता. रुग्णांची संख्या मोठी होती. पहिल्या लाटेत 40 आणि 50 वर्षांपुढील व्यक्ती कोरोनाबाधित झाल्या होत्या, तर दुसऱया लाटेत 30 आणि 40 वयोगटातील व्यक्ती सर्वात जास्त बाधित झाल्या होत्या. त्यामुळे तिसऱया संभाव्य लाटेत तरुण आणि मुलांना कोरोना संसर्ग जास्त प्रमाणात होऊ शकतो. मात्र, पहिल्या आणि दुसऱया लाटेचा विचार करता तिसऱया लाटेचा प्रभाव कमी असेल, असे मत पालिकेच्या कोरोना सेंटरमध्ये उपचार करणाऱया एका ज्येष्ठ डॉक्टरने व्यक्त केले आहे.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article