काँग्रेसमध्ये आता संवाद आणि चर्चेची परंपरा संपुष्टात आलीय
काँग्रेसच्या कार्यशैलीत फार मोठा बदल झाला आहे. कॉँग्रेसमध्ये आता संवाद आणि चर्चेची परंपरा संपुष्टात आली आहे याचं मला खूप दुःख वाटतं, अशी खंत कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली.
पुण्यामध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, काँग्रेसमधील चर्चा आणि संवादाची परंपरा आता संपुष्टात आली आहे, मला याचे खूप दुःख वाटते. पक्षाला याबाबत आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आमची धोरणे चुकीची असू शकतात. अशा परिस्थितीत त्यांना योग्य मार्गावर आणण्यासाठी अशा सत्रांची गरज आहे.
एक वेळ होती, जेव्हा पक्षात माझ्या शब्दाला किंमत होती. मात्र, आता माझ्या शब्दाला किंमत आहे की नाही हे मला माहीत नाही, अशी खंतही सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली.
पक्ष कुठे चाललाय हे समजणं मुश्कील
एक वेळ अशी होती की, कॉँग्रेस पक्षात कार्यशाळा, शिबिरांचं आयोजन केलं जायचं, त्यामध्ये पक्षाची वाटचाल कशी सुरू आहे याबाबतचं मंथन व्हायचं, पण अलीकडे कॉँग्रेस आपली विचारधारा आणि संस्कृती हरवत चालली आहे, पक्ष कुठे चाललाय हे समजणं मुश्कील झालं आहे, असं शिंदे म्हणाले.