ड्रोनचे नवे आव्हान उलथवून लावण्यास लष्कर सक्षम, लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचा पाकिस्तानला इशारा
जम्मूतील हवाई दलाच्या तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या ड्रोन हल्ल्याबाबत गुरुवारी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी चिंता व्यक्त केली. ड्रोन सहजासहजी उपलब्ध होत असल्यामुळे निश्चितच जटिल आव्हाने उभी ठाकली आहेत. हा धोका देशांनी घडवून आणलेला असो वा देशांनी स्वतः केलेला असो, ड्रोनचे नवे आव्हान उलथवून लावण्यास आमचे लष्कर सक्षम आहे, अशा शब्दांत लष्करप्रमुखांनी अप्रत्यक्षरीत्या पाकिस्तानला इशारा दिला आहे.
एका ‘थिंक-टँक’च्या डिजिटल संवादसत्रात लष्करप्रमुख जनरल नरवणे बोलत होते. ते म्हणाले, ड्रोन सहजासहजी उपलब्ध होऊ लागल्यामुळे निश्चितच आव्हानांमध्ये वाढ झाली आहे. सर्व जवानांना ड्रोनच्या या नव्या आव्हानाबाबत सावध केले आहे. हा धोका देशांनी घडवून आणलेला असो किंवा देशांनी स्वतः केलेला असो. हा धोका उलथवून लावण्यासाठी लष्कराच्या क्षमता विकसित केल्या जात आहेत. सर्व सुरक्षा दलांचे जवान या आव्हानाचा प्रतिकार करण्यासाठी सक्षम आहेत, किंबहुना लष्कराने या अनुषंगाने काही ठोस पावलेही उचलली आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. जम्मू-कश्मीरमध्ये दहशत पसरवण्यासाठी दहशतवादी आता ड्रोन्सचा वापर करीत आहेत. याच दृष्टिकोनातून ड्रोन्सचा प्रतिकार करण्याच्या तंत्रावर लष्कराचा पह्कस राहणार असल्याचे लष्करप्रमुखांनी यावेळी नमूद केले.
नियंत्रण रेषेवर घुसखोरी थंडावली; लडाखमध्येही परिस्थिती सामान्य
z हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये शस्त्र्ासंधी करार झाल्यानंतर नियंत्रण रेषेवर कसलीही घुसखोरी झालेली नाही. घुसखोरी झाली नसल्यामुळे कश्मीरमध्ये दहशतवाद्यांची संख्या कमी आहे. जम्मू- कश्मीरमध्ये आमची दहशतवादविरोधी आणि घुसखोरीविरोधी मजबूत व्यवस्था आहे. येथे शांती आणि सामंजस्य राखण्यासाठी आमचे अभियान सुरूच राहील. दुसरीकडे चीन आणि हिंदुस्थानमध्ये फेब्रुवारीमध्ये सैन्यवापसीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लडाखच्या एलएसीवरही परिस्थिती सामान्य आहे, असेही जनरल नरवणे यांनी सांगितले.