अमित शहांच्या मुलाची प्रॉपर्टी 10 पटींनी वाढली, ईडी त्यांची चौकशी करणार नाही – नाना पटोले
लोकांच्या पैशाचा दुरुपयोग करणाऱयाची नक्कीच चौकशी व्हायला हवी. पण निरपराध लोकांवरही ईडी, सीबीआय लावण्याचा प्रयत्न भाजपाकडून होत आहे. अमित शहांच्या मुलाची प्रॉपर्टी 10 पटींनी वाढली. पण त्यांची ईडी चौकशी करणार नाही. या तपासयंत्रणांचा दुरुपयोग भाजपा करतेय. त्याचाच परिणाम आपल्याला राज्यात दिसतोय, अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.
ईडी, सीबीआय चौकशीची भीती दाखवून राज्य सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न भाजपाकडून सुरू आहे’, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. आरोप तर सगळ्यांवरच होतात. नरेंद्र मोदींवर देखील आरोप केले आहेत. प्रधानमंत्री सहाय्यता निधीत झालेल्या भ्रष्टाचारावर मोठय़ा प्रमाणावर आरोप झाले आहेत. मग त्यांचीही ईडीची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
राज्यपालांच्या अधिकारांचा दुरुपयोग
राज्यपालांच्या अधिकारांचा दुरुपयोग करून भाजपा ज्या पद्धतीने अशांतता माजवत आहे, हे सगळे लोक बघत आहेत. हे लोकशाहीला धरून नाही, असे ते म्हणाले.
महाजनकोसाठी नियम डावलून कोळसा खरेदी
महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ नागपूर यांच्यामार्फत रुखमाई इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला पदाचा गैरवापर करून तसेच टेंडरचे नियम डावलून कोळसा पुरवठा करण्याचे काम देण्यात आले आहे. यासाठी देण्यात आलेले देकार पत्र व अंतिम आदेश यांना स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.