Header

गोगलगायींच्या दोन नव्या प्रजाती, एका पोटजातीचा शोध; ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनचे संशोधन

गोगलगायींच्या दोन नव्या प्रजाती, एका पोटजातीचा शोध; ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनचे संशोधन

snail

निसर्गात गोगलगायींच्या शेकडो प्रजाती आढळतात. त्यामध्येच आणखी दोन नव्या प्रजाती व एका नव्या पोटजातीची भर पडली आहे. ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या वतीने तेजस ठाकरे आणि टीमने आंबोली व राधानगरी येथे हा शोध लावला आहे. ‘वरदिया आंबोलीएन्सीस’ आणि ‘पेरोटेरिया राजेशगोपाली’ अशी नावे त्यांना देण्यात आली आहेत. वरदिया आंबोलीएन्सीस हे तेजस ठाकरे यांचे आंबोलीमधील पाचवे नवे संशोधन आहे. आतापर्यंत त्यांनी आंबोलीत तीन खेकडे, एक मासा, एक गोगलगाय यांचा शोध लावला आहे.

tejas-thackeray-new-research

गोगलगाय या विषयावर अभ्यास करणारे महाराष्ट्रात मोजकेच आहेत. ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या वतीने गोगलगायींवर संशोधन सुरू असतानाच गोगलगायीच्या या दोन नव्या प्रजाती व एका पोटजातीचा शोध लागला. लंडनच्या नॅचरल हिस्ट्री म्युझियमचे डॉ. दिनारझर्दे रहीम यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या संशोधनात तेजस ठाकरे यांच्यासह गोगलगायी आणि शिंपल्यांवर पीएचडी करणारे डॉ. अमृत भोसले, दीपक मुळे, लंडनचे बेन राऊसन यांचा समावेश होता.

‘वरदिया आंबोलीएन्सीस’ यामध्ये वरदिया ही गोगलगायीची पोटजात आणि वरदिया आंबोलीएन्सीस ही नवी प्रजाती या टीमला कोकणच्या सीमेवरील आंबोली येथील हिरण्यकेशी मंदिर परिसरात आढळली. साप, पाली अशा उभयचर प्राण्यांवर संशोधन करणारे ज्येष्ठ संशोधक

डॉ. वरदगिरी यांचे नाव या पोटजातीला दिले गेले. डॉ. वरदगिरी यांचे उभयचर प्राण्यांच्या संशोधनात उल्लेखनीय योगदान आहे. त्यांनी आजपर्यंत उभयचर प्राण्यांच्या 56 नव्या प्रजाती आणि 4 पोटजाती शोधून काढल्या आहेत असे डॉ. भोसले यांनी सांगितले. ‘वरदिया आंबोलीएन्सीस’ या गोगलगायीचा डॉ. भोसले यांनी जनुकीय अभ्यास केला. तिचा शंख, प्रजनन संस्था अन्य गोगलगायींपेक्षा निराळी असल्याचे त्यांना आढळले. गोगलगायी या शाकाहारी किंवा मांसाहारी असतात. वरदिया आंबोलीएन्सीस गोगलगाय ही शाकाहारी आणि मांसाहारीही आहे असे त्यांना आढळले.

राधानगरी अभयारण्यातील उगवाई देवी मंदिर परिसरात संशोधन करताना गोगलगायीची ‘पेरोटेरिया राजेशगोपाली’ ही दुसरी नवी प्रजाती या संशोधकांना आढळली. त्या प्रजातीला त्यांनी वाघांच्या संरक्षणासाठी काम करणारे ग्लोबल टायगर पह्रमचे महासचिव डॉ. राजेश गोपाल यांचे नाव दिले. ही गोगलगाय फक्त मांसाहारी असून अन्य छोटय़ा गोगलगायी खाऊन जगते. स्वप्नील पवार, अक्षय खांडेकर आणि विनोद आडके यांनी या संशोधनकामी सर्वेक्षणासाठी सहकार्य केले.

पश्चिम घाटात संशोधन करणार

भविष्यातही गोगलगायींवरील संशोधन सुरू राहील. पश्चिम घाटात महाराष्ट्राच्या हद्दीत येणाऱया परिसरात ठाकरे वाईल्ड लाईफ फाऊंडेशनच्या वतीने गोगलगायींवर संशोधन करण्याची या संशोधकांची योजना आहे. पश्चिम घाटात प्राण्यांच्या विविध जाती-प्रजाती आढळतात. त्यातील अनेक अजूनही जगाला अपरिचित आहेत. त्यावर संशोधन झाले पाहिजे असे त्यांचे मत आहे.

तेजस ठाकरे यांचे मोलाचे योगदान

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र व संशोधक तेजस ठाकरे यांचे या संशोधनासाठी मोलाचे योगदान लाभले. जंगलामध्ये जाऊन संशोधन करणे आणि संशोधन अहवालाचे लेखन यासाठी तेजस ठाकरे यांचे विशेष योगदान राहिले.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article