कुस्तीपटू सुमीत मलीकवर दोन वर्षांची बंदी; ऑलिम्पिकमधील सहभागाच्या आशांवर पाणी
हिंदुस्थानला कुस्ती या खेळामधून ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून देण्याच्या सुमीत मलीक याच्या आशांवर शुक्रवारी पाणी फेरले गेले. प्रतिबंधीत उत्तेजक सेवन केल्या प्रकरणी सुमीत मलीक दोषी सापडला आहे. त्याचे बी सॅम्पलही पॉझिटिव्ह आले असल्यामुळे युनायटेड वर्ल्ड रेसलिंग या जागतिक कुस्ती संघटनेकडून त्याच्यावर दोन वर्षांच्या बंदीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. आता निकालाला चॅलेंज देण्यासाठी सुमीत मलीककडे एक आठवडा असणार आहे.
सुमीत मलीक सोफिया येथे जागतिक ऑलिम्पिक पात्रता फेरीत सहभागी झाला होता. 125 किलो वजनी गटात त्याने टोकियो ऑलिम्पिकचे तिकीटही बुक केले. पण सोफिया येथे झालेल्या डोप टेस्टमध्ये तो फेल झाला. त्यामुळे गेल्या महिन्यात त्याला तात्पुरत्या निलंबनाची शिक्षा सुनावण्यात आली होती. 30 जून रोजी त्याचे बी सॅम्पल उघडण्यात आले. पण त्याचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जागतिक कुस्ती संघटनेकडून त्याला 3 जूनपासून दोन वर्षांच्या बंदीची शिक्षा सुनावण्यात आली आहे, अशी माहिती कुस्ती फेडरेशन ऑफ इंडियाच्या सूत्रांकडून देण्यात आली.
चॅलेंज करण्याबाबत विचार सुरू
जागतिक कुस्ती संघटनेच्या या निर्णयाला चॅलेंज करायचे की नाही यासाठी सुमीत मलीककडे एक आठवडा असणार आहे. सुमीत मलीकशी संबंधीत वकील यावर विचार करीत आहेत. गुडघ्याला झालेल्या दुखापतीवर उपचार करण्यासाठी त्याने नकळतपणे उत्तेजकाचे सेवन केले. यासाठी सुमीत मलीक चॅलेंज करील असे वाटत आहे. पण या सर्व प्रकिया होईपर्यंत ऑलिम्पिक संपलेले असेल. त्यामुळे सुमीत मलीक टोकियो ऑलिम्पिकला मुकणार हे निश्चित आहे.