बॉलिवूडचे कलादिग्दर्शक लीलाधर सावंत यांची हलाखीची परिस्थिती;उपचारासाठी पैसे नाहीत, पत्नीने केली मदतीची याचना
बॉलिवूडमध्ये शंभरहून अधिक चित्रपटांचे कला दिग्दर्शन करणारे कलादिग्दर्शक लीलाधर सावंत सध्या वाशीम येथे अतिशय हलाखीचे जीवन जगत आहेत. त्यांच्याकडे उपचारांसाठीही पैसे नाहीत. बॉलिवूडसाठी 25 वर्षे सेवा दिलेला आणि दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेला हा कलावंत आज उपेक्षिताचे जिणे जगत आहे. सावंत यांच्या पत्नीने बॉलिवूड सेलिब्रेटींकडे मदतीची याचना केली आहे.
लीलाधर सावंत यांच्या दोन बायपास सर्जरी झाल्या असून त्यांना दोनदा ब्रेन हॅमरेजचे अॅटॅक आलेले आहेत. त्यांच्यावरील उपचारासाठी सर्व पैसे खर्च झाल्याचे त्यांच्या पत्नी पुष्पा सावंत यांनी सांगतिले. आता तर लीलाधर बोलूही शकत नाहीत. सध्या भाडेकरूकडून मिळणाऱया पैशांवर घर चालत आहे. ज्या कलाकारांनी त्यांच्यासोबत काम केलेय त्यांनी मदतीसाठी पुढे यावे, अशी विनंती पुष्पा सावंत यांनी केली आहे.
117 चित्रपटांचे कला दिग्दर्शन
लीलाधर यांनी ‘दीवाना’, ‘जिद्दी’, ‘मै खिलाडी तू अनाडी’, ‘अनाडी नंबर-1’, ‘हत्या’, ‘100 डेज’, ‘हद कर दी आपने’ अशा 117 चित्रपटांचे कलादिग्दर्शन केले आहे. त्यांना दादासाहेब फाळके, फिल्मफेअर आणि अन्य बरेच पुरस्कार मिळालेले आहेत. लीलाधर सावंत यांची बॉलिवूडमध्ये सर्जनशील कला दिग्दर्शक म्हणून ख्याती होती आणि आहे.