म्हाडाचा मोठा निर्णय; थकीत सेवा शुल्कावरील 400 कोटींचे व्याज माफ
म्हाडाने थकीत सेवा शुल्कावरील 400 कोटी रुपयांचे व्याज माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अभय योजनेंतर्गत हा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे म्हाडा वसाहतीमधील रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबईत म्हाडाच्या 56 हून अधिक वसाहती आहेत. म्हाडातर्फे या वसाहतींना पंपमन, इलेक्ट्रिशियन, सुरक्षा रक्षक, लिफ्ट देखभाल-दुरुस्ती, पाणीपुरवठा, सफाई कामगार अशा विविध सेवा पुरविल्या जातात, त्यापोटी म्हाडा या वसाहतींमधील रहिवाशांकडून सेवाशुल्क वसूल करते. हे थकीत सेवा शुल्क वसूल करण्यासाठी म्हाडाने अभय योजना जाहीर केली आहे.
या अभय योजनेंतर्गत म्हाडाच्या रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. 1 एप्रिल 1998 ते 2021 पर्यंतच्या थकीत सेवा शुल्कावरील व्याज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
यासंदर्भात बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, राज्य सरकारने मागील 23 वर्षांपासून प्रलंबित राहिलेला प्रश्न तडीस नेला असून सेवा शुल्काच्या रकमेवरील व्याज पूर्णपणे माफ केले आहे. या पार्श्वभूमीवर सेवा शुल्क भरण्यासाठी ई-बिलिंगची सुरुवात केली आहे. याचा फायदा म्हाडाच्या 56 वसाहतींमधील एक लाख 46 हजार रहिवाशांना होईल.
सरकारच्या निर्णयानुसार म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या वतीने सेवा शुल्काच्या वसुलीसाठी एप्रिल 2021पासून अभय योजना राबवली आहे. या योजनेंतर्गत 1998 ते 2021 पर्यंतचे संपूर्ण व्याज माफ करून या काळातील मुद्दल पाच वर्षांमध्ये दहा हप्त्यांमध्ये भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच एकरकमी सेवा शुल्क भरणाऱया गाळेधारकांना विशेष सवलत देण्यात आली आहे.