बारावीचा निकाल जुलैअखेरपर्यंत शक्य नाहीच, निकालाच्या सूत्राविषयी अद्याप निर्णय नाही
बारावीचा निकाल कोणत्या सूत्राच्या आधारे जाहीर करायचा याविषयी शालेय शिक्षण विभागाने अद्याप निर्णय न घेतल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बारावीचा निकाल जुलैअखेरपर्यंत जाहीर करणे राज्य शिक्षण मंडळाला शक्य नसल्याचे स्पष्ट मत प्राध्यापक, प्राचार्य व्यक्त करीत आहेत.
बारावीचे निकाल जुलै अखेरपर्यंत लावण्याचे सर्वोच्च न्यायालयाने निर्देश देऊन आता आठवडा उलटला तरी राज्य सरकारने बारावीच्या निकालाचे सूत्र जाहीर न केल्यामुळे राज्यातील बारावीचे विद्यार्थी व त्यांचे पालक चिंताग्रस्त झाले आहेत. त्यामुळे निकालाचे सूत्र तातडीने जाहीर करा, अशी मागणी राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने राज्य सरकारकडे पेली असल्याचे महासंघाचे समन्वयक प्रा. मुकुद आंधळकर यांनी सांगितले.
केवळ अंतर्गत मूल्यमापनावर निकाल ठरवणे चुकीचे
केवळ अंतर्गत मूल्यमापनावर बारावीचा निकाल जाहीर करणे चुकीचे ठरेल, असे मत बारावीचे शिक्षक व्यक्त करीत आहेत. बारावीच्या गुणांवर पदवी व इतर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया अवलंबून असते. त्यामुळे बारावीसाठी कोणत्या मूल्यमापनाचा अवलंब केला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निकालाच्या कामासाठी 30 ते 45 दिवस लागणार
बारावीच्या निकालाचे सूत्र जाहीर केल्यानंतर किमान 30 ते 45 दिवस निकाल जाहीर व्हायला लागतील. त्यामुळे अजून उशीर झाल्यास आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षणापासून वंचित राहावे लागेल, अशी भीतीही शिक्षक महासंघाने व्यक्त केली असून उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे प्रवेश उशिरा होतील व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल, असेही महासंघाने स्पष्ट केले.