भात पेरणी करण्यासाठी नवे यंत्र विकसित
चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या भाताची पेरणी करण्यासाठी नवे यंत्र पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केले आहे. हे यंत्र सध्या चंद्रपूर कृषी विभागाने जिल्ह्यात आणले असून, त्यामाध्यमातून भाताची पेरणी वेळेत होत आणि आर्थिक बचतही मोठी होत आहे. या यंत्रामुळे तासाभरात दीड हेक्टर शेतीवर पेरणी केली जाऊ शकते. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचू शकतो.
प्रतिहेक्टरी केवळ पाच हजार रुपये पेरणीचा खर्च येतो. या यंत्राचा सर्वात मोठा फायदा म्हणजे या हंगामात गावात मजूर मिळत नाही. त्यामुळे पेरणीची कामे खोळंबतात किंवा लांबणीवर जातात. आता या यंत्रामुळे ही अडचण दूर झाली आहे. हे यंत्र भात पिकवणाऱ्या या जिल्ह्यासाठी वरदान ठरणार असल्याने शेतकरी त्याच्या वापराने खुश आहेत. गावागावात आता या यंत्राची मागणी येऊ लागली असून, सधन शेतकरी ते विकत घेऊ शकतात आणि सर्वसाधारण शेतकरी भाड्याने वापरू शकतात. सध्या प्रायोगिक तत्वावर कृषी विभागाने हे यंत्र इथे आणले असून, त्याचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखवले आहे. यंत्राची करामत बघून शेतकरी खुश आहेत.