चार दिवसांपासून लसींचा पुरवठा नाही, सोलापूर जिल्ह्यातील सर्व लसीकरण केंद्र बंद
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दररोज आढळणाऱया कोरोनारुग्णांची संख्या तीनशेहून अधिक आहे. ‘डेल्टा’ या नव्या व्हेरियंटमुळे आणि तिसऱया लाटेच्या भीतीने 18 वर्षांवरील तरुणांसह ज्येष्ठ नागरिक लस टोचून घेण्यासाठी पुढे येत आहेत. लसीअभावी शहर-ग्रामीणमधील एकही केंद्र सुरू नव्हते. लसीची मागणी केली आहे; परंतु पुण्यावरून काहीच निरोप नसल्याने लस कधीपर्यंत मिळेल, हे अनिश्चितच असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
जिल्ह्यातील साखर कारखाने, खासगी कंपन्यांसह खासगी दवाखान्यांनी 60 हजार डोसची मागणी केली आहे; परंतु चार दिवस होऊनही लस मिळालेली नाही. जिल्ह्यातील 72 खासगी केंद्रांतून लसीकरण करण्यास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी परवानगी दिली होती. आता आणखी 13 कारखाने, खासगी दवाखाने व काही कंपन्यांनी लसीकरणास परवानगी मागितली आहे. त्या खासगी केंद्रांकडून संबंधित आस्थापनांतील कर्मचाऱयांना व खासगी दवाखान्यांतून पैसे घेऊन लस टोचण्याचे नियोजन आहे. मात्र, लस मिळत नसल्याने मान्यता मिळूनही ही केंद्रे बंदच आहेत.
दरम्यान, ‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’अंतर्गत 36 दवाखान्यांनाही लसीकरणास परवानगी यापूर्वीच दिली आहे. मात्र, त्यांनाही लस मिळाली नसून, त्या ठिकाणी लसीकरण बंदच आहे. दरम्यान, मोहोळ व सोलापूर शहरांतील काही नागरी आरोग्य केंद्रांवर तुरळक प्रमाणात लसीकरण झाल्याचे पाहायला मिळाले. लस संपल्याने संपूर्ण जिल्हाभरातील लसीकरण बंदच राहील, अशी माहिती जिल्हा समन्वयक डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी दिली.
शहरातील 21, तर ग्रामीणमधील 70 केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. त्या ठिकाणी 18 ते 44 आणि 45 ते 59 वयोगटांतील व 60 वर्षांवरील व्यक्ती आणि 45 वर्षांवरील को-मॉर्बिड रुग्ण असे लसीकरणाचे टप्पे करण्यात आले आहेत. लस पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याने आता लस उपलब्ध झाल्यानंतर 18 ते 44 वयोगटातील लसीकरण बंद ठेवून को-मॉर्बिड आणि 60 वर्षांवरील व्यक्तींच्या दुसऱया डोसला प्राधान्य दिले जाईल, असेही डॉ. पिंपळे यांनी सांगितले.