नगर जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट टळले, विश्रांतीनंतर पावसाचे पुनरागमन
15 दिवसांच्या विश्रांतीनंतर नगर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने बळीराजावरील दुबार पेरणीचे संकट टळले आहे. शनिवार, रविवारी वरुणराजाने कृपा केल्याने बळीराजा सुखावला असून, जिल्ह्यात सरासरी 117 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
नगर जिल्ह्यात यंदा मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. तसेच, यावर्षी समाधानकारक पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. त्यामुळे शेतकरीवर्ग सुखावला होता; परंतु पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पावसाने दडी मारल्याने बळीराजा चिंतेत सापडला होता. दरम्यान, शनिवार, रविवारी पावसाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी दमदार हजेरी लावल्याने बळीराजाचा जीव भांडय़ात पडला आहे. पिकांनाही जीवदान मिळाले आहे. पावसाने मागील पंधरा दिवसांपासून दडी मारली होती. पाऊस लांबणीवर पडल्याने खरिपाच्या हंगामात दुबार पेरणीचे मोठे संकट जिल्ह्यावर होते. परंतु, दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे दुबार पेरणीचे संकट टळले आहे. जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे शेतकऱयांना दिलासा मिळाला आहे.
उत्तर नगर जिल्ह्यात आर्द्राची जोरदार सलामी
उत्तर नगर जिल्ह्यात आर्द्राच्या पावासाने जोरदार सलामी दिली. या पावसामुळे पेरणी झालेले सोयाबीन आणि कपाशीच्या पिकांना जीवदान मिळाले आहे. तर रखडलेल्या पेरण्यांना आता वेग येणार आहे. दरम्यान, श्रीरामपूर शहरात तुफानी पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. तसेच, तळघरात असलेल्या दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱयांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. संगमनेरात दुपारी काही ठिकाणी संततधार होती, तर काही ठिकाणी कमी- अधिक पाऊस सुरू होता. या पावसामुळे शेतकरी आनंदला आहे. राहाता तालुक्यातील नपावाडी व अन्य परिसरात जोरदार पाऊस झाला.
मुळा धरणात 977 क्युसेकने पाण्याची आवक
राहुरी – घाटमाथ्यावर पाऊस मंदावल्याने कोतुळकडून मुळा धरणाकडे येणाऱया नव्या पाण्याचा प्रवास धिम्यागतीने सुरू आहे. सोमवारी सकाळी 6 वाजता कोतुळकडून मुळा धरणाकडे 977 क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. 21 ते 28 जून या सप्ताहाच्या कालावधीत धरणाच्या कमांड एरियात झालेल्या पावसामुळे मुळा धरणात 500 दशलक्ष घनफूट नवीन पाणी वाढले आहे. त्यामुळे सोमवारी सकाळी धरणाचा पाणीसाठा 8 हजार 672 दशलक्ष घनफूट झाला होता.