घरातील बाप्पा दोन फुटांचा; मंडळातील मूर्ती चार फुटांची
सलग दुसऱया वर्षी गणेशोत्सवावर कोरोनाचे विघ्न आले असताना राज्य सरकार कोणता निर्णय घेते याकडे गणेशोत्सव मंडळांचे लक्ष लागून राहिले होते. यासंदर्भात सरकारने आज गणेशोत्सवासाठीची नियमावली जाहीर केली असून यंदाही गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. गणेशोत्सव मंडळांना गणेशमूर्ती चार फुटांची, तर घरगुती गणेशासाठी दोन फुटांच्या मूर्तीची मर्यादा घालून देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आगमन आणि विसर्जन मिरवणुका काढण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
कोरोनाच्या संकटामुळे मागील वर्षी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा लागल्यानंतर यंदा तरी थाटात उत्सव साजरा होईल, अशी आशा सर्वांनाच होती. मात्र पहिल्या लाटेपाठोपाठ कोरोनाची दुसरी लाट आल्याने गणेशभक्तांच्या उत्साहावर पाणी फेरले गेले आहे. संभाव्य तिसऱया लाटेचा धोका लक्षात घेत राज्य सरकारने यंदाही गणेशोत्सवावरील निर्बंध कायम ठेवले आहेत. कोणतीही गर्दी न करता साधेपणाने गणेशोत्सव साजरे करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.
गणेशोत्सव साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना
- स्वच्छेने दिलेल्या देणग्याच स्वीकाराव्यात. जाहिरातींमुळे गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी. आरोग्य विषयक आणि सामाजिक संदेश देणाऱया जाहिराती करण्याला प्राधान्यक्रम द्यावा.
- सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रम वा शिबिरे घेण्याला प्राधान्य देण्यात यावे. कोरोना, डेंग्यू, मलेरिया यासह स्वच्छतेबाबत जनजागृती करावी.
- राज्य सरकारने लागू केलेले तीन स्तरीय निर्बंध गणेशोत्सवातही कायम असतील. शिथिल केले जाणार नाहीत.
- आरती, भजन, कीर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी. ध्वनी प्रदूषणासंदर्भातील नियमांचे पालन करण्यात यावे.
- नागरिकांची गर्दी होऊ नये या अनुषंगाने गणेश दर्शनाची सुविधा ऑनलाइन, केबल नेटवर्किंग, वेबसाइट, फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करून देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करावी.
- गणपती मंडपात निर्जंतुकीकरण आणि थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था करण्यात यावी.
- आगमन आणि विसर्जन मिरवणुका काढू नयेत. विसर्जनस्थळी करण्यात येणारी आरती घरीच करावी. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी विसर्जनस्थळी जाणे टाळावे. चाळीतील आणि इमारतीतील गणेशमूर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्र काढू नये.
- महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोक प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था यांच्या मदतीने गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी.
- कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारसह आरोग्य विभाग, महापालिका प्रशासन, स्थानिक पोलीस प्रशासन यांनी ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करावे.
गणेशोत्सवासाठी नियमावली
- गणेशोत्सवासाठी मंडळांनी महापालिका वा स्थानिक प्रशासनाची परवानगी आवश्यक.
- कोरोनामुळे महापालिका वा स्थानिक प्रशासनाने ठरवलेल्या धोरणानुसार मर्यादित स्वरूपातच मंडप उभारण्यात यावा. गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणे अपेक्षित असल्याने भपकेबाज सजावट करणे टाळावे.
- शक्य असल्यास गणेशमूर्तीऐवजी धातूच्या वा संगमरवरी मूर्तीचे पूजन करावे. पर्यावरणपूरक शाडूची मूर्ती असल्यास शक्यतो घरच्या घरी मूर्तीचे विसर्जन करावे. ते शक्य नसल्यास जवळच्या कृत्रिम विसर्जनस्थळी मूर्ती विसर्जित करावी.