शरद पवार–उद्धव ठाकरे भेट; सुमारे दोन तास चर्चा
राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी विविध विषयांवर दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे दोन तास चर्चा झाली. संसद आणि विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
शरद पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन वेळोवेळी राज्याच्या महत्त्वाच्या विषयांवर सल्लामसलत करीत असतात. मंगळवारी सायंकाळी त्यांनी ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली. पुढील आठवडय़ात 5 व 6 जुलै रोजी होणारे विधिमंडळाचे अधिवेशन, अधिवेशनात चर्चेसाठी येणारे विषय, त्याचप्रमाणे मराठा आरक्षण, ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण तसेच पेंद्रीय कृषी कायदा, कोरोनाची तिसरी लाट आदी विषयांवर या भेटीत चर्चा झाल्याचे समजते. चर्चेचा तपशील समजू शकला नसला तरी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेण्याचा काँग्रेसचा आग्रह आहे, त्याबद्दलही चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या भेटीवेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे हेदेखील उपस्थित होते.