Header

बीडीडी चाळींच्या पुनर्विकासात एकही रहिवासी बेघर होणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

बीडीडी चाळींच्या पुनर्विकासात एकही रहिवासी बेघर होणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

bdd-chawl-01

बीडीडी चाळींचा पुनर्विकास करताना कोणीही रहिवासी बेघर होणार नाही. चाळीतील प्रत्येकाच्या पुनर्वसनाची काळजी घेतली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिली. त्याशिवाय पोलिसांच्या घरांबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मंत्री स्तरावर समिती स्थापन करण्याबरोबरच पोलिसांच्या निवासस्थानांचा पुनर्विकास व पुनर्वसनाचा आराखडा तयार करण्याचे आदेशही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.

बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाच्या संदर्भात वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या चाळींचा पुनर्विकास हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यामुळे तो सुनियोजितपणे पूर्ण करण्यात येईल. या चाळीत पोलीस दलातील कर्मचाऱयांना घरे दिली आहेत. त्यातील काही घरे दिवंगत पोलीस कर्मचाऱयांच्या कुटुंबीयांकडे तसेच सेवानिवृत्त पोलिसांकडेही घरे आहेत. या चाळींचा पुनर्विकास करताना पोलिसांच्या कुटुंबीयांचा सहानभूतीपूर्वक विचार करावा लागेल. पुनर्विकासातून म्हाडाच्या माध्यमातून उपलब्ध होणारी घरे पोलिसांना देण्याबाबतही आराखडा करावा, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

या बैठकीला गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशीषकुमार सिंह, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर, माजी आमदार सचिन अहिर, सुनील शिंदे, नगरसेवक आशीष चेंबुरकर उपस्थित होते.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article