राजू शेट्टी, मेधा पाटकर यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट; केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात ठराव करण्याची मागणी
केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्यांना देशभरात मोठय़ा प्रमाणात विरोध होत आहे. या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी तसेच ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ठराव करावा. यासाठी शेतकरी संघटनांना विश्वासात घ्यावे, अशी मगाणी या भेटीदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली.
केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात शेतकरी दिल्लीच्या सीमेवर गेल्या 7 महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. या पार्श्वभूमीवर माजी खासदार राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर आज सायंकाळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीविषयीची माहिती राजू शेट्टी यांनी ट्विटरद्वारे दिली. राज्य सरकार येत्या अधिवेशनात कृषी कायद्यातील सुधारणा करण्याचे विधेयक पारित करणार असून यासंदर्भात राज्यातील सर्व शेतकरी संघटनांशी चर्चा करूनच पुढील निर्णय घ्यावा, अशी मागणी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाविकास आघाडीचे प्रमुख शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. यावेळी मंत्री बाळासाहेब थोरात, दादाजी भुसे, बाळासाहेब पाटील, कृषी, पणन, विधी व न्याय विभागाचे सचिव यांच्यासह उपस्थित होते, असे शेट्टी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.