सोलापूर विद्यापीठात कोरोनामुळे मृत पावलेल्या पालकांच्या पाल्याची शैक्षणिक व परीक्षा फी माफ
राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रात अल्पावधीत नावाजलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने कोविडमुळे मृत पावलेल्या पालकांच्या पाल्यास शैक्षणिक व परीक्षा फी माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली. गतवर्षी विद्यापीठाने राज्यात सर्वप्रथम 20 टक्के परीक्षा फी माफ करून विद्यार्थी हिताचा निर्णय घेतला होता.
सोमवारी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या समवेत राज्यातील विद्यापीठाच्या कुलगुरूंसोबत ऑनलाइन बैठक झाली. या बैठकीत शैक्षणिक व परीक्षा फी माफ करण्याचा निर्णय झाल्याचे डॉ. फडणवीस यांनी सांगितले. कोरोना आजाराने मरण पावलेल्या आई-वडिलांच्या महाविद्यालयीन व विद्यापीठाची शैक्षणिक फी आणि परीक्षा फी माफ करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठ संकुलात शिकणाऱया पात्र विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. या बैठकीत सोलापूर जिल्ह्यातील पररिस्थितीची माहिती देण्यात आली.
सलग दुसऱया वर्षी विद्यार्थी हिताचा निर्णय
राज्यात सर्वप्रथम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने कोविड महामारीमुळे गतवर्षी 20 टक्के परीक्षा फी विद्यार्थ्यांना परत केली आहे. यंदाच्या वर्षीदेखील शासनाच्या मार्गदर्शक सूचना व निर्णयाप्रमाणे विद्यापीठाकडून फीबाबत योग्य निर्णय घेण्यात येईल, असे कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी सांगितले. ही बैठक अत्यंत सकारात्मक झाली असून, विद्यापीठाच्या या निर्णयाचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी कौतुक केले आहे.