पूर्ण फी न भरल्याने शाळेची कारवाई, विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गात ‘नो एंट्री!’
शालेय शुल्क न भरू शकणाऱया विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करू नये, असे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र त्यानंतरही दादर येथील आयइएस पद्माकर ढमढेरे इंग्रजी माध्यमाच्या शाळा प्रशासनाने शिक्षण शुल्क न भरणाऱया काही विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गातून बाहेरचा रस्ता दाखविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याबरोबरच शाळेने काही विद्यार्थ्यांचे निकालही राखून ठेवले असल्याची तक्रार पालकांकडून करण्यात आली आहे. संतप्त पालकांनी आता शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकाऱयांकडे धाव घेतली असून शाळेवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
कोरोनाच्या काळात अनेक क्षेत्रांना फटका बसला. अनेकांच्या नोकऱया गेल्या, तर काहींवर पगार कपातीची कुऱहाड बसली. त्यामुळे शाळेतील अनेक पालकांसमोर पूर्ण फी भरण्यात अडचणी येत असून शाळा प्रशासनाने मात्र फीसाठी आक्रमक पवित्रा धारण केल्याच्या अनेक तक्रारी पुन्हा एकदा पुढे येऊ लागल्या आहेत. विशेष म्हणजे यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई करू नये, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. मात्र त्यानंतरही दादर येथील आयइएस पद्माकर ढमढेरे इंग्रजी माध्यमाच्या शाळेने फीच्या मुद्दय़ावरून विद्यार्थ्यांवर कारवाईचा बडगा उगारल्याची तक्रार पालकांनी केली आहे. शाळा प्रशासनाने यंदा संपूर्ण फी आकारण्याचा निर्णय घेतल्याने अनेक पालकांसमोर अडचण निर्माण झाली आहे. अनेक पालकांनी फीसंदर्भात चर्चा करण्यासाठी शाळा प्रशासनाकडे अनेक विनवण्या केल्या. मात्र पालकांच्या या मागणीला केराची टोपली दाखविल्याचा आरोप पालकांकडून करण्यात आला आहे.
काय आहेत पालकांचे आरोप?
- सध्या ऑनलाइन वर्ग सुरू आहेत. त्यामुळे शाळेच्या कोणत्याही वस्तू किंवा जागेचा वापर होत नाही. असे असतानादेखील शाळेकडून नेहमीप्रमाणेच शुल्क आकारण्यात येत आहे.
- फीच्या मुद्दय़ावरून शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई करू नये, असे मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. मात्र त्यानंतरही शाळेने अनेक पूर्ण फी न भरणाऱया विद्यार्थ्यांवर कारवाई केली आहे.
- शाळेने या विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गात बसण्यास परवानगी दिलेली नाही. ज्या पालकांनी पूर्ण फी भरलेली आहे, त्याच पालकांना ऑनलाइन वर्गाची लिंक आणि इतर सविस्तर माहिती देण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
- काही विद्यार्थ्यांचे निकालदेखील राखून ठेवले असल्याचे पालकांकडून सांगण्यात आले आहे.