अतिधोकादायक 154 इमारतींचे वीज, पाणी तोडले
मुंबई महापालिकेने इमारत अतिधोकादायक घोषित करूनही घर रिकामे न करणार्या इमारतींवर महापालिकेने कारवाई सुरू असून गेल्या तीन महिन्यांत 154 इमारतींचे वीज आणि पाणी तोडण्यात आलेम् आहे तर ज्या रहिवाशांनी घरे रिकामी केली आहेत अशांना संक्रमण शिबिरात हलवण्यात आले आहे. दरम्यान, पालिकेने आतापर्यंत 148 धोकादायक इमारती जमीनदोस्त केल्या आहेत.
पावसाळ्यात धोकादायक इमारती पडण्याच्या घटना घडत असतात. मुंबईत अतिधोकादायक स्थितीत असलेल्या 407 इमारती आहेत. या इमारतींपैकी गेल्या तीन महिन्यांत 154 इमारतींचे वीज व पाण्याची जोडणी तोडण्यात आली आहे. मुंबईत 407 इमारती अतिधोकादायक असून यापैकी 98 इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत तर 21 अतिधोकादायक इमारतींवर तोडक कारवाई करण्याची प्रक्रिया करण्याआधी तांत्रिक सल्लागार समितीचा सल्ला घेतला जाणार आहे. मुंबईतीला 53 अतिधोकादायक इमारतींचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहेत तर 81 इमारती तांत्रिक कारणामुळे रिकाम्या करण्यात आल्या नसून या इमारतीतील वीज व पाणी कनेक्शन अद्याप तोडण्यात आलेले नाही. इमारती कोसळून जीवितहानी होऊ नये, याकरिता महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
धोकादायक इमारती
- पालिका 58
- सरकारी 27
- खासगी 322