एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या
एमपीएससीची मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही अद्याप नोकरी नसल्याच्या तणावातून व आर्थिक परिस्थितीमुळे एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. बुधवारी (दि.3) दुपारी साडेचार वाजता फुरसुंगीजवळील गंगानगर येथे ही घटना घडली.
स्वप्नील सुनील लोणकर (24, रा. गंगानगर, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. स्वप्नील 2019च्या एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाला होता. गेले दीड वर्ष त्याची मुलाखत झालेली नव्हती. त्यानंतर त्याने पुन्हा 2020 मध्ये परीक्षा दिली हाती. पूर्वपरीक्षेत तो उत्तीर्ण झाला होता. मात्र, कोरोनाच्या संसर्गामुळे मुख्य परीक्षा झाली नाही. या सगळ्या तणावातूनच त्याने आत्महत्या केल्याचे मृत्युपूर्वी चिठ्ठीत लिहून ठेवले आहे. स्वप्नीलच्या वडिलांचा शनिवार पेठेत छोटा प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय आहे. बुधवारी (30 जून) सकाळी त्याचे आई-वडील कामानिमित्त बाहेर पडले. त्यानंतर त्यांची मुलगी दुपारी साडेचार वाजता घरी आली तेव्हा स्वप्नीलने त्याच्या खोलीमध्ये गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. या प्रकाराबाबत तिने आई-वडिलांना खबर दिली. त्याला रुग्णालयात हलविल्यानंतर डॉक्टरांनी त्यास मृत घेषित केले.