दहिसर येथील ज्वेलर्स हत्या प्रकरण, आणखी दोघांना अटक
दहिसरच्या साईराज ज्वेलर्सच्या मालकाच्या हत्येप्रकरणी आणखी दोघांना पोलिसांनी अटक केली. बंटी पाटीदार आणि प्रमोद आतरिया अशी त्या दोघांची नावे आहेत. गोळीबार करण्यासाठी बंटीने चार महिन्यांपूर्वी शस्त्र खरेदी केले होते. हत्येप्रकरणी त्या दोघांना अटक करून आज न्यायालयात हजर केले असता 10 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
गेल्या आठवडय़ात दहिसर पूर्वच्या गावडेनगर येथील साईराज ज्वेलर्सच्या दुकानात चोरटय़ांनी शिरून गोळीबार केला होता. या गोळीबारात दुकानाचे मालक शैलेंद्र पांडेचा जागीच मृत्यू झाला होता. शैलेंद्रच्या हत्येप्रकरणी दहिसर पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. वरिष्ठ निरीक्षक प्रवीण पाटील यांच्या पथकातील डॉ. चंद्रकांत घार्गे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ओम तोटावार, अभिनय पवार, प्रवीण निंबाळकर, सुनील पोवार, शिवाजी देसाई यांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून आयुष पांडे, निखिल चांडाल, चिराग रावल, अनिकेत महाडिक आणि उदय बालीला अटक केली होती.
पोलीस कोठडीत असलेल्या त्या पाच जणांच्या चौकशीत प्रमोद आणि बंटीचे नाव समोर आले. त्या दोघांच्या अटकेसाठी दहिसर पोलिसांचे पथक इंदोरला गेले होते. इंदोर येथून प्रमोदला पोलिसांनी ताब्यात घेतले. प्रमोदच्या चौकशीनंतर बंटीला ताब्यात घेऊन त्या दोघांना अटक करून मुंबईत आणले. साईराज ज्वेलर्सचे दुकान लुटण्यासाठी चिरागने बंटीला टीप दिल्याचे तपासात समोर आले आहे. बंटी हा पूर्वी डायमंडच्या व्यवसायात असल्याने त्याला ज्वेलर्सच्या व्यवसायाबाबत माहिती होती. त्या पाचही आरोपींना समोरासमोर ठेवून पोलीस आता चौकशी करणार आहेत. ज्वेलर्सला लुटल्यावर चिराग, अनिकेतला 40 टक्के तर उर्वरित आरोपींना 60 टक्के रक्कम मिळणार होती.
चार महिन्यांपूर्वी सुरतमध्ये केली होती लूटमार
बंटी या टोळीचा मुख्य सूत्रधार असून त्या टोळीने चार महिन्यांपूर्वी सुरत येथील सोन्याच्या दुकानात दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता. तो प्रयत्न फसल्यानंतर या टोळीने दोन वाहने चोरली होती. एका वाहनाचे पेट्रोल संपल्याने ते वाहन तिकडेच त्यांनी सोडले तर दुसरे वाहन घेऊन ते इंदोरला गेले. सुरतचा दरोडय़ाचा प्रत्यन फसल्यावर बंटीने चिरागला सांगून मुंबईत दरोडा टाकण्याचा कट रचला. काही महिन्यांपूर्वी बंटीने इंदोर येथून शस्त्र खरेदी केले होते. शस्त्र खरेदी केल्यावर शूटरने इंदोर येथील जंगलात गोळीबाराचा सराव केला होता.