मास्टरमाइंड इंदौरमध्ये… पोलीस मागावर! 24 तासांत पाचजणांना अटक; दागिनेही हस्तगत
दहिसर येथील ओम साईराज ज्वेलर्सचे मालक शैलेंद्र रमाकांत पांडे यांची गोळय़ा झाडून हत्या करुन पळून गेलेल्या तीन शूटरसह दोन स्थानिक तरुणांना दहिसर पोलिसांनी अवघ्या 24 तासांत शिताफीने अटक केली. आयुष पांडे, निखिल चांडाल, चिराग रावल, अनिकेत महाडिक आणि उदय बाली अशी या पाचजणांची नावे आहेत. ते सर्वजण सध्या पोलीस कोठडीत असून चोरीच्या उद्देशानेच त्यांनी शैलेंद्र यांची हत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या गोळीबाराचा मास्टरमाईंड मध्य प्रदेशात असून त्याच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.
बुधवारी 30 जूनला सकाळी साडेदहा वाजता शैलेंद्र पांडे यांची त्यांच्याच दुकानात घुसून तीन अज्ञात मारेकऱयांनी गोळी झाडून हत्या केली होती. या हत्येनंतर त्यांनी सुमारे बारा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन पलायन केले होते. दिवसाढवळय़ा झालेल्या या हत्येने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे दहिसर पोलिसांनी आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम सुरू केली होती. त्यासाठी दहा विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. आरोपींचा शोध सुरू असताना गोळीबारानंतर ते सर्वजण सुरतला पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.अतिरिक्त पोलिस आयुक्त दिलीप सावंत यानी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. पोलिस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यानी तपासासाठी पथक बनवले.वरिष्ठ निरीक्षक प्रवीण पाटील यांच्या पथकातील डॉ. चंद्रकांत घार्गे, ओम तोटावार, अभिनय पवार, प्रवीण निंबाळकर, सुनील पोवार, शिवाजी देसाई व अन्य पोलीस पथकाने आयुष पांडे, निखिल चांडाल आणि चिराग रावल या तीन शूटरला सुरतच्या ओलपाड, बारबोधन परिसरातून शिताफीने अटक केली, त्यांच्याकडून सर्व दागिने, एक गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे जप्त केली, त्यानंतर दहिसर येथे राहणाऱया उदय बाली आणि अनिकेत महाडिक या दोघांना पोलिसांनी अटक केली
दहिसर ज्वेलर्स हत्याप्रकरण शूटरला होती दुकानाची माहिती
शैलेंद्र यांच्या दुकानात एक बटण आहे. हे बटण दाबल्यास दुकानाचे शटर आपोआप बंद होते. ही माहिती शूटरला होती. त्यामुळे दुकानाचे शटर बंद होण्यापूर्वीच त्यांनी त्यांच्या डोक्यात गोळी झाडल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
तीन दिवसांपूर्वी मुंबईत आले
मारेकरी हे तीन दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातून मुंबईत आले होते. हत्येच्या दिवशी त्यांनी एक ऑक्टिव्हा बाईक चोरी केली. या बाईकवरून त्यांनी दुकानात प्रवेश करुन शैलेंद्र यांची गोळी झाडून हत्या केली. त्यानंतर बाईक एका ठिकाणी टाकून ते तिघेही कारमधून सुरतला पळून गेले होते. या टोळीचा मुख्य आरोपी मध्य प्रदेशात असून त्याचे नाव आरोपींच्या चौकशीतून बाहेर आले आहे. यातील निखिल, आयुष आणि उदय हे तिघेही मध्य प्रदेशच्या इंदौरचे रहिवासी आहेत. आयुष हा कॉलेजमध्ये शिकतो, निखिल हा गॅरेजमध्ये तर उदय खासगी कंपनीत नोकरी करतो. चिरागचे मिठाईचे दुकान, तर अंकित हा झोमेटोमध्ये कामाला असल्याचे तपासात उघडकीस आले, तिन्ही शूटर अंकित आणि चिरागच्या संपका&त होते, त्यांनीच त्यांना मदत केली होती. सध्या पाचही आरोपी पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. चौकशीत त्यांनी चोरीच्या उद्देशाने ही हत्या केल्याचे सांगितले असले तरी ही हत्या सुपारी देऊन केली आहे का याचाही पोलिसांकडून तपास सुरू आहे.