दिल है के मानता नहीं… आमीरचा पुन्हा तलाक!
>> द्वारकानाथ संझगिरी
हा मानसिक घटस्फोट आहे का? की इंटेलेक्चुवल? की आध्यात्मिक?
मी गाडी चालवत होतो. बाजूला बायको होती. आणि तिने मोबाईल चाळता चाळता बातमी दिली, ‘आमीर खान याने दुसरा घटस्पह्ट घेतला.’
हिंदी सिनेमातल्या शॉटप्रमाणे मी कचकन गाडी थांबवली नाही. किंबहुना माझ्या चेहऱयावरचे भाव प्रदीपकुमारएवढे निर्विकार होते. फिल्मी माणसाचा घटस्पह्ट आणि सेट झालेल्या रोहित शर्माने विकेट देणं ही मला पेट्रोलचे भाव वाढण्याएवढी सामान्य बातमी वाटते.
का नाही वाटावी?
आपल्या रेखाला (‘आपला’ हा शब्द सचिन आपला, अमिताभ आपला या मर्यादित आपलेपणातूनच घ्यावा) चक्क एक सख्खी आई आणि तीन सावत्र आई होत्या. (इथे फक्त अधिकृत आईंचा विचार केलाय).
किशोर कुमारने चक्क चार लग्नं केली.
त्याने योगिता बालीबरोबर केलेलं लग्न केवळ व्हेकन्सी झाली. आणि ती भरलीच पाहिजे या नाइलाजापोटी केलं.
आशा पारेख म्हणते, ‘‘तिला आमीर खान हा या पिढीमधला देवानंद वाटतो.’’
पण देवानंदने लग्न एकच केलं. मला कुणीतरी सांगितलं की, देवानंद आणि बायकोचं नंतर नंतर पटायचं नाही. ते एकाच घरात वेगवेगळे राहिले आणि फक्त रोज जेवायला डायनिंग टेबलवर एकत्र येत, पण त्यांनी घटस्पह्ट घेतला नाही.
मला फक्त एका गोष्टीचं आश्चर्य वाटायचं की, चिकणा आमीर सलमानप्रमाणे सुंदर मुलीच्या प्रेमात का पडला नाही? सलमान हिऱयाच्या ढिगातून कोहिनूर शोधून काढतो. आमिरचा कल सौंदर्यापेक्षा बुद्धीकडे आहे, असं मला सांगण्यात आलं. बहुधा मादाम क्युरी केवळ या काळात जन्माला आली नाही म्हणून मिसेस आमीर खान झाली नाही.
आणि सलमानचा बुद्धी या गोष्टीशी काय संबंध?
सलमान बुद्धिमान असेल तर आमीर खान सर आयझॅक न्यूटन आहे
मला एक कलाकार म्हणून आमीर खान बुद्धिमान वाटतो. ‘पाणी फाउंडेशन’सारख्या कार्यातून तो सामाजिक जाणीव दाखवतो. पण त्याच्या या घटस्पह्टानंतर माझा त्याच्या बुद्धीबद्दलचा आदर द्विगुणित झालाय. त्याने माझ्या घटस्पह्टाविषयीच्या सर्व कल्पना उलटय़ा पुलटय़ा केल्या आहेत.
मला अस वाटायचं की, नवऱयाने दुसरा घरोबा केला किंवा बायकोने आणि कुणाला डोळा मारला, किंवा तीव्र मतभेद झाले,
काही शारीरिक प्रॉब्लेम्स झाले वगैरे की घटस्पह्ट होतो. आनंदाच्या झोपाळय़ावर मुलाला मधे ठेवून हातात हात असताना आणि उंच झोका घेताना घटस्पह्ट घ्यावासा वाटणे हा क्रांतिकारी कॉन्सेप्ट आहे.
हे मी नाही सांगत, तो सांगतोय.
त्याने दिलेल्या निवेदनात तो म्हणतो, ‘‘गेल्या पंधरा वर्षांत आमचा एकत्रितपणे घालवलेला प्रत्येक क्षण आनंदात गेला. आमच्या नात्यात विश्वास, प्रेम आणि आदर वाढतच गेला. आता एक नवा अध्याय सुरू करू. त्यात आम्ही नवरा-बायको नसू.’’
निव्वळ आनंदाच्या अजिर्णापोटी दिलेला हा घटस्पह्ट आहे का?
वर तो सांगतो, ‘‘आम्ही आमच्या मुलाचे (आझाद) याचे सहपालक असू. कुटुंब म्हणून एक असू, सिनेमा, ‘पाणी फाऊंडेशन’चे काम एकत्र करू.’’
म्हणजे फक्त शयनगृह बदललं का? बरं, हल्ली एका शयनगृहात असायला नवरा-बायको असावंच लागतं असं नाही.
म्हणजे हा मानसिक घटस्पह्ट आहे का?
की इंटेलेक्चुवल? की आध्यात्मिक?
घटस्पह्टावर अधिकार असणाऱया एलिझाबेथ टेलर हिला सुद्धा ही कल्पना सुचली नव्हती. तिने एका नवऱयाशी दोनदा लग्न केलं, पण असा घटस्पह्ट घेतला नाही.
दुखाश्रू असतात तसे आनंदाश्रू असतात हे माहीत होतं.
माणूस दुःखात बेशुद्ध पडतो तसा आनंदात पडतो हे पण ऐकलं होतं.
पण आनंदाच्या ताटावर बसून एकमेकांना घास भरवत असताना घटस्पह्ट देतात हे आमीर-कविताने शिकवलं.
आता बायकोला आनंदात ठेवावं की नाही हा यक्षप्रश्न पुढे उभा ठाकला आहे. ये दिल है के मानता नही…!