साय-फाय – ड्रॅगन मॅन
>> प्रसाद ताम्हनकर
उत्क्रांती आणि विशेषतः मानवी उत्क्रांती हा अनेकांच्या आवडीचा विषय. या उत्क्रांतीबद्दल अनेक थोर संशोधकांनी आपल्या अभ्यासाला जगासमोर आणले आहे. त्यातील काही दाव्यांविषयी आजही मत-मतांतरे आहेत, वाद चालूच आहेत. मात्र उत्क्रांतीचा अभ्यास अव्याहत सुरूच आहे. नुकताच या उत्क्रांतीच्या अभ्यासाला एक नवे वळण देणारा शोध चायनाच्या हार्बिन प्रांतात लागला आहे.
उत्तर पूर्व चीनचा भाग असलेला ‘हार्बिन’ प्रांत हा खरे तर आजवर जगभरात तिथे होणाऱया ‘इंटरनॅशनल आईस फेस्टिव्हल’साठी प्रसिद्ध आहे. मात्र आता या नव्या शोधामुळे तो वेगळ्या कारणाने जगभरात चर्चेला आला आहे. नक्की हा शोध आहे तरी काय? तर, या शोधात संशोधकांना एक मानवी कवटी मिळाली आहे. ही कवटी तब्बल 1 लाख 46000 वर्षं जुनी आहे. मानवाच्या या नव्या पूर्वजाला सध्या ‘होमो लोंगी’ (Homo Longi) असे नाव प्रदान करण्यात आले आहे. संशोधकांनी याला ‘ड्रगन मॅन’ असेदेखील एक नाव दिलेले आहे. संशोधकांच्या मते हा आजवर सापडलेला सर्वात सुरक्षित आणि महत्त्वाचा असा जीवाश्म आहे. या ‘होमो लोंगी’ (Homo Longi) प्रजातीचा विकास आजच्या मानवासारखा ‘होमो सेपियन्स’प्रमाणे न होता, एका वेगळ्याच प्रजातीप्रमाणे झाला आहे. ही वेगळी प्रजाती हजारो वर्षे या पृथ्वीवरती नांदली आणि मग अचानक लुप्त झाली.
या नव्या संशोधनामुळे ‘मानवी उत्क्रांती’च्या अभ्यासाला एक वेगळेच वळण मिळण्याची चिन्हे आहेत. या जीवाश्मामुळे 1.46 लाख वर्षापूर्वीच्या पृथ्वीच्या वातावारणालादेखील संशोधकांना समजून घेता येणार आहे. हे जीवाश्म म्हणजेच ही कवटी साधारण 23 सेंटीमीटर लांब आणि 15 सेंटीमीटर रुंद आहे. आजच्या आधुनिक मानवाच्या कवटीपेक्षा, ही आकाराने बरीच मोठी अशी कवटी आहे. यात मानवी मेंदूसाठीची जागा मात्र सध्याच्या कवटीप्रमाणेच आहे. साधारण 50 वर्षे वयाच्या ‘ड्रगन मॅन’ची ही कवटी असावी, असे संशोधकांचे मत आहे.
या कवटीच्या मदतीने संशोधकांनी या ‘ड्रगन मॅन’ची अंगकाठी कशी असेल त्याचादेखील अंदाज बांधला आहे. या ‘ड्रगन मॅन’ची शरीरयष्टी अत्यंत मजबूत अशी होती. या मजबूत शरीरयष्टीमुळेच ही प्रजाती भयंकर अशा गारठय़ातदेखील तगून राहू शकली. चायनाच्या या भागात वर्षभर बर्फाचे राज्य असते. एका आधुनिक सॉफ्टवेअरच्या मदतीने या कवटीचा अभ्यास करण्यात आला असून, त्यातून मिळालेल्या डाटाचा अभ्यास करून; ही मानवाची एक नवीनच प्रजाती असल्याचा दावा चायनाच्या संशोधकांनी केला आहे. तूर्तास तरी जगभरातील इतर संशोधकांनी या दाव्याची पुष्टी केलेली नाही. या जीवाश्माचा अभ्यास करणारे ‘जिओ युनिव्हर्सिटी’चे संशोधक, ‘जी कियान्ग’ हे मात्र आपल्या दाव्यावरती ठाम असून, या जीवाश्माच्या अभ्यासासाठी ‘जिओ केमिकल’ तंत्रज्ञानाचीदेखील मदत घेण्यात आली आहे. या कवटीच्या अभ्यासासाठी हिची 95 अन्य प्राचीन कवटय़ांशी तुलना करण्यात आलेली आहे आणि त्याद्वारे संशोधकांनी काही आराखडे मांडलेले आहेत. काही काळापूर्वी इस्त्राईलच्या ‘नेशहर रामला’ शहरात मानवाचे असेच काही प्राचीन अवशेष मिळून आले आहेत. ते अवशेष आणि हे सध्याच्या मानवाच्या अत्यंत जवळचे असलेले नवे अवशेष यांच्या अभ्यास आपल्या उत्क्रांतीच्या अनेक टप्प्यांचा नव्याने परिचय करून देऊ शकेल, अशी शास्त्रज्ञांना आशा आहे.
‘डॅगन मॅन’च्या जीवाश्माच्या शोधाची कथादेखील अत्यंत रोचक अशी आहे. 1933 साली हा ‘हार्बिन’ प्रांतातील सॉन्गुआ नदीवरती पूल बनवत असलेल्या चिनी मजुराला ही कवटी सापडली. ही कवटी जपानी लोकांच्या हाताला लागू नये, म्हणून त्याने घराच्या विहिरीत लपवून ठेवली. मृत्यूसमयी त्याने आपल्या वारसदारांना याविषयी माहिती दिली. या मजुराच्या वंशजांनी यानंतर खोदकाम करून ही कवटी मिळवली आणि त्यानंतर ती ‘बेई जिओ युनिव्हर्सिटी’च्या ‘जिओ सायन्स’ म्युझियमला देण्यात आली. त्यानंतर ही कवटी संशोधनासाठी उपलब्ध झाली.
prasad.tamhankar@gmail.com