विम्बल्डन टेनिस स्पर्धा- सानिया – रोहनची विजयी सलामी
सानिया मिर्झा व रोहन बोपण्णा या हिंदुस्थानच्या जोडीने विम्बल्डन टेनिस ग्रॅण्डस्लॅममधील मिश्र दुहेरी गटात रामकुमार रामनाथन व अंकिता रैना या हिंदुस्थानच्याच जोडीला 6-2, 7-6 अशा दोन सेटमध्ये पराभूत करीत दुसऱया फेरीत वाटचाल केली.
दरम्यान, याआधी सानिया मिर्झा व बेथानी मॅटेक सॅण्डस या जोडीची विम्बल्डन टेनिस या मानाच्या ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेची सुरुवात दमदार झाली. सानिया मिर्झा व बेथानी मॅटेक सॅण्डस या जोडीने पहिल्याच फेरीत डिसारे क्राऊझिक व अॅलेक्सा गुआरेची या सहाव्या सिडेड जोडीला 7-5, 6-3 अशा सरळ दोन सेटमध्ये पराभूत करीत महिला दुहेरीत पुढे पाऊल टाकले.
तसेच हिंदुस्थानच्या दिवीज शरण व रोहन बोपण्णा या जोडीला पुरुष दुहेरीच्या पहिल्या फेरीत हार सहन करावी लागली. एडुअर्ड रॉजर वॅसलीन व हेन्री कोण्टिनेन या जोडीने दिवीज शरण व रोहन बोपण्णा या जोडीला 7-6, 6-4 अशा फरकाने नमवले आणि दुसऱया फेरीत प्रवेश केला.
सबालेंका, स्विअतेकची आगेकूच
महिला एकेरीत एरिना सबालेंकाने मारिया सेरानो हिला 6-0, 6-3 असे नमवले. तसेच इगा स्विअतेकने आयरीना बेगू हिच्यावर 6-1, 6-0 अशा फरकाने अगदी सहज विजय मिळवला. पुरुषांच्या एकेरीत आंद्रेय रुबलेव याने फॅबियो फॉगनिनी याचे आव्हान 6-3, 5-7, 6-4, 6-2 अशा फरकाने परतवून लावले.