मुंबईत ज्येष्ठांचे घरोघरी लसीकरण होणार! पालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय, आरोग्य सेविकांकडून सर्वेक्षण सुरू
मुंबईत लवकरच ज्येष्ठ आणि घराबाहेर पडून लसीकरण करू न शकणाऱया नागरिकांसाठी पालिका घरोघरी जाऊन कोरोना लसीचा डोस देणार आहे. यासाठी पालिकेने आरोग्य सेविकांच्या माध्यमातून 24 प्रभागांत सर्वेक्षण सुरू केले आहे. पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी ही माहिती दिली.
मुंबईत 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण सुरू झाले. सद्यस्थितीत पालिका आणि सरकारच्या सुमारे 389 केंद्रांवर वेगाने लसीकरण सुरू आहे. 21 जूनपासून लसीकरण मोहिमेला वेग आला असून दररोज सुमारे एक लाख डोस देण्यात येत आहेत. यामध्ये खासगी सोसायटय़ांनाही रुग्णालयांशी करार करून लसीकरणाची परवानगी दिल्यामुळे लसीकरणाचा वेग आणखी वाढला आहे. 18 वर्षे आणि त्याहून वयोगटातील व्यक्तींची दुसरी मात्रा घेणाऱयांची टक्केवारी 10 टक्के एवढी आहे. मात्र, अजूनही सुमारे 47 लाख मुंबईकरांचे लसीकरण शिल्लक आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाने सरकारला ज्येष्ठ नागरिकांचे घरोघरी लसीकरण का करू शकत नाही, असा सवाल उपस्थित केला होता. या पार्श्वभूमीवर सरकारने प्रायोगिक तत्त्वावर पुण्यात जेष्ठ नागरिकांचे लसीकरण लसीकरण करणार असल्याचे सांगितले होते.
आतापर्यंत 55 लाख जणांना दिला डोस
सद्यस्थितीत मुंबईत सुमारे 55 लाखांहून अधिक व्यक्तींचे लसीकरण झाले आहे. मात्र, त्यात घराबाहेर पडू न शकणाऱया ज्येष्ठ आणि इतर व्यक्तींसाठी घरोघरी जाऊन लसीकरणासाठी आग्रह धरला जात आहे. त्याअनुषंगाने, पालिकेकडून सुरू असलेल्या सर्वेक्षणातून नेमका आढावा घेतला जात असल्याचे डॉ. गोमारे यांनी सांगितले. दरम्यान, आतापर्यंत 55 लाख 51 हजार 449 पालिकेने पहिला डोस दिला आहे. यामध्ये 11 लाख 7 हजार 333 जणांना दुसरा डोस देण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.