Header

आगळं वेगळं – मास्क

आगळं वेगळं – मास्क

mask

>>मंगल गोगटे

एक साधा फेस मास्क तो काय, पण किती महत्त्वाचा आहे हे आता सर्वांना कळलेलं आहे. कारण कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी ते एक महत्त्वाचे आणि मुख्य म्हणजे सहज सोपे हत्यार आहे.

आता जगात कोरोनाविरुद्ध एकप्रकारे युद्धच सुरू आहे. कोरोना विरुद्ध मानवजात. कोण राहणार या पृथ्वीवर? कोरोना की माणसं? जो जिंकेल तो राहील. म्हणूनच या लढाईत जिंकण्यासाठी माणसाने लस शोधली. शिवाय वेगवेगळी आयुधे वापरण्यास प्रारंभ केला. फेस मास्क वा मुखपट्टी, साबण आणि सोशल डिस्टन्सिंग. यातील साबण आपल्यासाठी नवीन नव्हता. हात खराब झाल्यावर, बाहेरून आल्यावर हात-पाय धुण्याची सवय होतीच आपल्याला. आता फक्त जरा जास्त वेळा धुवू लागलो एवढंच. माणसामाणसांत फार अंतर ठेवायची खूप सवय अशी नव्हती. तरीही जीवावरच बेतल्यावर तीही अंगी बाणवावी लागली. मास्क मात्र त्यातल्या त्यात नवीनच होता. जेफरसन मेडिकल कॉलेज, फिलाडेल्फिया इथे एक ऑपरेशन पाहायला काही विद्यार्थी आलेले होते. गोष्ट 1902 ची. त्यावेळी भूलतज्ञ, नर्सेस, सर्जन वा थिएटरमधली इतर मंडळी मास्क वापरत नसत आणि विद्यार्थ्याना सर्जरी शिकण्यासाठी ती प्रत्यक्ष पाहणे हाच मार्ग होता.

त्यातल्या एका विद्यार्थाच्या असं लक्षात आलं की, सर्जन वा इतर कुणी बोलू लागले तर त्यांच्या तोंडातून लाळेचे थेंब उडत आणि अर्थातच ते ऑपरेशन होत असणाऱया रुग्णाच्या जखमेवर पडत, ज्यामुळे त्याला संसर्ग होऊ शकत होता. डॉ. ऑलिस हॅमिल्टन यांना हे लक्षात आल्यावर त्यांनी सूक्ष्म जीव वाढवण्यासाठी वापरण्यात येणारी एक कल्चर प्लेट त्या ऑपरेशन टेबलावर ठेवली. नंतर लक्षात आलं की, अनेक सूक्ष्म जीवांच्या वसाहती त्या प्लेटवर वाढल्या आहेत आणि त्यातील निम्मे जंतू हे तर अतिशय घातक स्वरूपाचे होते.

डॉ. ऑलिसला आढळले की, नुसत्या बोलण्यातून थेंब 24 सेंमीपर्यंत उडत होते, तर खोकण्यातून 36 सेंमीपर्यंत. कुजबुजण्यातून तर बोलण्यापेक्षा जास्त थेंब निर्माण होत होते. त्यावरून असा निष्कर्ष काढला गेला की, ज्या रुग्णावर शस्त्रक्रिया चालू आहे, त्याला या तोंडातून उडणाऱया लाळेमधून घातक जंतुसंसर्ग होऊ शकतो. तिचे हे संशोधनपर लेख 1905 मध्ये  ‘जामा’ (JAMA) या आंतरराष्ट्रीय ख्यातनाम जर्नलमध्ये प्रकाशित झाले. शस्त्रक्रियेच्या वेळेस रुग्णाला होणारा जंतुसंसर्ग टाळण्यासाठी सर्जन व नर्सेसनी फेस मास्क वापरणे किती अत्यावश्यक आहे हे तिने साधार दाखवून दिले. पुढे जेफरसन मेडिकल कॉलेजमधील ऑपरेशन थिएटरमध्ये जेव्हा हे फेस मास्क प्रत्यक्ष वापरले गेले तेव्हा पुढील आठ महिन्यांत एकही जंतुसंसर्गाचा रुग्ण सापडला नाही.

1910-11 मांचुरियात (ईशान्य चीन) न्यूमोनिक प्लेग, ज्यात 50 हजार मरण पावले, तो हवेतील दूषित थेंबांमार्फत पसरत होता हे लक्षात आले. मग केवळ फेस मास्कच्या वापरामुळे हा नियंत्रणात आणला गेला. 1918-19 या काळात स्पॅनिश फ्लूने जगभरात कोटय़वधी लोक मरण पावले, पण सॅन फ्रान्सिस्को येथे फेस मास्क व सोशल डिस्टन्सिंगमुळे खूप कमी प्रमाणात हा संसर्ग पसरला व त्या मानाने कमी जण मरण पावले. हा एक साधा फेस मास्कचा चमत्कार, तर सध्याचा हा कोरोना / कोविड-19 संसर्ग आपल्याला नक्कीच टाळता येईल — एका साध्या फेस मास्कच्या वापरामुळे व सोशल डिस्टन्सिंगही पाळल्यामुळेही. प्रश्न तोच तर आहे. खरं तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे की, मास्क हा फॅशन करण्यासाठी वा दाखवण्यासाठी नाही. तो एका रोगाचा प्रसार थांबवण्यासाठी आहे आणि तो चांगले फिल्टर्स असलेला मास्क लावणं, सगळ्यांनी पाळणं गरजेचं आहे. दक्षिण कोरीयातील लोक तर सार्वजनिक जागी कोरोनाचे जंतू पृथ्वीवर अवतरण्याआधीपासूनच मास्क वापरत होते. कुणीही आजारी असेल तर त्याने घराबाहेर पडताना मास्क वापरावा व इतरांसाठी संसर्ग टाळावा हा अलिखित नियम ते पाळतात.

जागतिक आरोग्य संघटनेच्या आरोग्य आणीबाणीचे कार्यकारी संचालक माईक रायन यांनी तर 2020 च्या सुरुवातीसच म्हटलं की, सर्वांनी मास्क घालण्याची गरज नाही. ज्यांना लागण झाली आहे, त्यांनी घातले तरी पुरेल. नाहीतरी समोरच्याने मास्क नीट लावला आहे की नाही ते कळायला मार्ग नाही. त्यामुळे नीट आणि चांगला मास्क वापरणे ही आता प्रत्येकाची जबाबदारी आहे.

mangalgogte@gmail.com



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article