Header

अभिप्राय – ग्रामीण शब्दधन

अभिप्राय – ग्रामीण शब्दधन

shabdghan

>> अस्मिता प्रदीप येंडे

मराठी साहित्यात 1960 नंतर जे अनेक प्रवाह निर्माण झाले, त्यात ग्रामीण साहित्य हा महत्त्वाचा प्रवाह मानला जातो. ग्रामीण साहित्याने नवा आशय, जीवनाचे नवे क्षेत्र वाचकांसाठी खुले केले आहे.

ग्रामीण साहित्याने मराठी साहित्यात सध्या वेगळे वळण घेतलेले दिसून येते. यामध्ये आपल्याला प्रकर्षाने असे जाणवते की, ग्रामीण साहित्यामध्ये ग्रामीण भागातील अनेक प्रश्न आणि समस्या पुढे आणल्या जात आहेत. त्याचे माध्यम म्हणून कथा, कादंबऱया, कविता अशा काही साहित्य प्रकारांचा वापर केला जातो असे दिसून येते. या साहित्य प्रकाराच्या माध्यमातून हे प्रश्न पुढे आणले जातात किंवा ती साहित्यकृती त्यासाठी जबाबदार ठरते आणि त्याचबरोबर त्या लेखकाचा संघर्ष जर त्या बदलाच्या दृष्टीने असेल तर ते अधिक पुढे येऊन त्यातून जे अन्याय किंवा समस्या पुढे येतात, त्यावर काम करणारे आपल्याला काही प्रमाणात दिसून येतात. ‘गोतावळा’, ‘पांगिरा’, ‘तहान’, ‘बारोमास’, ‘कापूसकाळ’, ‘तुडवण’ या साहित्यातून ग्रामीण समस्यांची चित्रे उभी केलेली दिसून येतात.

ग्रामीण साहित्य म्हटले की, आली बोलीभाषा… त्या त्या प्रदेशातल्या बोलीभाषेमुळे ग्रामीण साहित्य आणखी खुलून दिसते. ग्रामीण भाग, तेथील समजुती, प्रथा, भाषा, सणवार, खाद्य संस्कृती, वेशभूषा, रीतिरिवाज, वेगवेगळ्या वृत्तीची माणसे, तिथल्या समस्या, विशिष्ट काळाचा प्रभाव या सगळ्या गोष्टी ग्रामीण साहित्यात वाचायला मिळतात. प्रा. व. बा. बोधे यांचे कोकरउडय़ा, रानपालखी, गावाकडची माती, कृष्णविवर, आम्ही शिवाराचे धनी आणखी बरीच पुस्तके गाजलेली आहेत.

‘शब्दधन’ या पुस्तकात प्रा. व. बा. बोधे यांच्या उपलब्ध पुस्तकातील निवडक देखणी, आशयसंपन्न वाक्ये समाविष्ट केलेली आहेत. उदाहरणादाखल आपण काही वाक्ये पाहू…
आडं फिरल्यावं घर फिरतं. (चंदन बटवा – ललित गद्य)
माणसाचे मन लोभात गुंतले की, माणुस मृत्यूला कवटाळतो.
(हसण्यासाठी जन्म आपुला- ललित गद्य)
मायेचा पाश वाईट ( फरारी – कादंबरी) इत्यादी.

प्रा. व. बा. बोधे यांनी अगदी सोप्या शब्दांत जीवनाचे मर्म या कादंबऱयांमधून सांगितले आहे. सुविचार, सुंदर वाक्यरचना यामुळे बोधे सरांचे लेखन अधिक भावते. ही निवडक वाक्ये वाचून मला सरांची पुस्तके वाचण्याचा मोह झाला. कोणतेही पुस्तक वाचले किंवा काही ऐकले की, काहींना त्याची नोंद करायची सवय असते. हो ना… लेखक सुनील पांडे यांच्या या नोंदी करण्याच्या सवयीमुळे खूप सुंदर शब्दांचा परिचय झाला. काही ग्रामीण शब्द हे हल्ली ऐकायला मिळत नाही. ते ठरावीक शब्द ग्रामीण भागातच ऐकायला मिळतात. ग्रामीण भाषेत एक प्रकारचा गोडवा आहे, तो अशा साहित्यातून अनुभवायला मिळतो. प्रत्येक प्रदेशाची भाषा म्हणजे वैशिष्टय़. भाषेच्या माध्यमातून शब्द शब्द एकरूप होऊन सुंदर बोली तयार होते. त्यातून आपण व्यक्त होतो.

लेखक सुनील पांडे यांनी ‘शब्दधन’ पुस्तकात प्रा. व. बा. बोधे यांचा परिचय, त्यांच्या पुस्तकांची यादी, त्यांच्या पुस्तकाला मिळालेले पुरस्कार यांची व्यवस्थित माहिती दिलेली आहे. सोबत बोधे सरांच्या पुस्तकांची यादी दिलेली आहे. ज्या वाचकांना ग्रामीण साहित्य वाचण्यात रस आहे, ज्यांना संशोधनात्मक अभ्यास करायचा आहे तसेच नव्या पिढीला प्रा. व. बा. बोधे सरांच्या साहित्याचा परिचय व्हावा यासाठी ‘शब्दधन’ हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे, मार्गदर्शक आहे.

प्रा. व. बा. बोधे यांच्यासारख्या संवेदनशील, ग्रामीण साहित्यात मोलाची भर घालणाऱया आशयसंपन्न लेखकाच्या साहित्याला नवा उजाळा दिल्याबद्दल तसेच इतक्या मार्मिक, जीवनाचे वास्तव मांडणाऱया साहित्याचा परिचय वाचकांना करून दिल्याबद्दल लेखक सुनील पांडे यांचे आभार. शेवटी काय आहे, साहित्य समाज जीवनाचा आरसा आहे. लेखकाला आलेले अनुभव हेच साहित्यात उमटतात. या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे मुखपृष्ठ. मुखपृष्ठावर ग्रामीण शब्दांची सुरेख मांडणी केलेली आहे. ल.म. कडू यांनी हे मुखपृष्ठ रेखाटले आहे. हे पुस्तक म्हणजे प्रा. व. बा. बोधे विकिपीडियाच आहे. हे ‘शब्दधन’ संग्रही असावे असेच आहे.

शब्दधन
संकलक ः सुनील पांडे
प्रकाशक ः अक्षरबंध प्रकाशन
मूल्य ः रुपये 200/-



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article