शिवमंदिरांच्या राज्यात – बारादेवीचा शिव अधिवास
>>नीती मेहेंदळे
मुंबईतील परळ, लालबाग या भागाचाही ‘मेक ओव्हर’ होत आहे. तथापि तेथील मराठी आणि इतर खुणा अद्याप कायम आहेत. त्यातच एक आहे बारादेवी मंदिर. सहाव्या शतकातला हा शिल्पकलेचा वारसा आजही जपला गेला आहे. गुप्तकाळाच्या अखेरीस निर्माण झालेली ही देवीची मूर्ती आहे. असे सांगितले जाते.
मुंबई महानगरात परळसारख्या दाट मनुष्यवस्तीच्या ठिकाणी सहाव्या शतकातला वारसा जपला जातोय हे ऐकून जरा कुतूहल वाटतं. हाफकिन्स इन्स्टिटय़ूट आणि पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मागच्या बाजूला जुनं परळ गाव वसलेलं आहे. ते परळ शहरी भागाला लागून आहे आणि गावात बारादेवी (हे अपभ्रंशित नाव वाटते, पूर्वी बारादेव नाव असावे) म्हणून भाग आहे, जिथे तीन अतिशय वैशिष्टय़पूर्ण एकामागे एक अशी लागून मंदिरं आहेत. या गल्लीत पहिलं लागतं ते चंडिका देवीचं मंदिर. मंदिराचं प्रशस्त आवार आणि त्यात नेटका सभामंडप यावरून मंदिराची सुंदर मांडणी लक्षात येते. गर्भगृहात देवीची आधुनिक, पण देखणी मूर्ती दिसते. भोवतालच्या प्रदक्षिणा पथावर मंदिराच्या बरोबर मागील बाजूला जुन्या मंदिराच्या खोबणी दिसतात. एका खोबणीत प्रवेशद्वारावर बाहेरच्या बाजूला दोन बऱयापैकी मोठय़ा बसलेल्या सिंहाच्या मूर्ती आहेत. या सिंहांपैकी एका सिंहाच्या आयाळीवर अतिशय कोरीव सुंदर नक्षी आहे. यातली भिंतीवरची मूर्ती पार झिजली आहे. तिची ओळख पटत नाही. शेजारच्या खोबणीत एक मोठा लक्षणीय वीरगळ आहे. त्यात राज्यावर स्वारी, लढाई व वीरमरण आलेली व्यक्ती / राजा स्वर्गात गेल्यावर आजूबाजूला सेवेसाठी अप्सरा दिसतात ही प्रतीकात्मक पुण्यप्राप्ती दिसते. शेजारी एक मोठे वानररूपातले शिल्प हुबेहूब खऱयासारखे दिसते. त्याने हातात काहीतरी धरलं आहे आणि तो बोलतो आहे अशा हावभावातलं हे बोलपं शिल्प आहे. ही सगळी शिल्पं निश्चितच प्राचीन दिसतात. या मंदिराला लागूनच बारादेवी मंदिर म्हणून एक अगदी छोटेखानी मंदिर आहे, जे आज पुरातन मूर्तींचा अभ्यास करणाऱयांसाठी प्रमुख आकर्षण आहे. या मंदिरात एक सहाव्या शतकातली उभी एकपाषाणी शिवमूर्ती आहे.
1931 मध्ये परळ विभागात रस्त्याचे बांधकाम चालू असताना सापडली होती. ती तेव्हा जवळच्या बारादेवी मंदिर विभागात ठेवली गेली असा संदर्भ मिळतो. तब्बल तीन मीटर उंच असलेली ही सप्तमूर्ती आहे. मुख्य मूर्तीतून निघालेल्या अजून सहा मूर्ती म्हणून सप्तमूर्ती. मुख्य मूर्ती मधोमध आहे, जी स्थानक मूर्ती प्रकारातली आहे. उजव्या बाजूची मूर्ती अभय मुद्रेतली आहे. डाव्या बाजूच्या मूर्तीच्या हातात बीजफल आहे. केवळ कर्णकुंडले व गळ्यातील हार सोडल्यास मधल्या मूर्तीच्या सध्या मूर्तीच्या अंगावर चुणीविरहित अंतरीय दिसते. तसेच या मूर्तीच्या डोक्यावरील मोठा जटामुकुट लक्ष वेधून घेतो. सर्व मूर्ती या दोन बाहूंच्या आहेत, पण सर्वात वरची मूर्ती ही दशभुज आहे. पाच शिवगण सदर मूर्तीच्या पायाजवळ असून त्यातले तीन निरनिराळी वाद्ये वाजवताना दिसतात. त्यातले एक बासरी हे असून दुसरे लहान वीणेसारखे तंतुवाद्य आणि तिसरे होडीच्या आकाराचे स्वरमंडलासारखे वाद्य दिसते.
पाच शिवगण सदर मूर्तीच्या पायाजवळ निरनिराळी वाद्ये वाजवताना दिसतात. ही एकपाषाणी अपूर्ण मूर्ती आहे. अपूर्ण अशासाठी की, खाली दाखविलेल्या शिवगणांपैकी उजव्या बाजूचे गण अस्पष्ट कोरलेले दिसतात. इसवी सनाच्या पाचव्या ते सहाव्या शतकातली म्हणजेच गुप्तकाळाच्या अखेरीस निर्माण केली गेलेली ही मूर्ती आहे असे पुरातत्त्व विभागाचे तज्ञ सांगतात. अधिक तपशिलात सांगायचे तर ही मूर्ती इ. स. 525 ते 530 मधली असावी. ही मूळ मूर्ती आहे. याची प्रत असलेली एक मूर्ती छत्रपती शिवाजी म्युझियममध्ये ठेवण्यात आली आहे.
ही मूर्ती आज पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत असल्याने हा वारसा संरक्षित स्थितीत आहे. या पुढे एका लहानशा टेकडीवर वाघेश्वरी देवीचे अतिशय सुंदर मंदिर आहे. इथेही देवीच्या मूळ मूर्तीखेरीज काही प्राचीन शिल्पं मंदिराच्या परिसरात स्थापित दिसतात. पाचकळशी अर्थात सोमवंशी क्षत्रिय समाजाची ही कुलदेवता आहे अशी माहिती मंदिराच्या पुजाऱयांकडून समजली. या बारादेवी परिसरात अजूनही काही जुनी मंदिरे पूर्वी असावीत ज्यावरून हे नाव पडले असावे, पण आजही या भागात हिंडताना आपण मुंबईसारख्या गजबजत्या शहरात आहोत यावर विश्वास बसत नाही, इतका हा भाग प्राचीनत्वाने भरलेला आणि वेगळेपण टिकवून असलेला दिसतो.
megmehen@gmail.com