मुद्दा – कोकणावर निसर्गाची वक्रदृष्टी!
>> पुरुषोत्तम कृ. आठलेकर
महाराष्ट्राला लाभलेला कोकण किनारपट्टी हा प्रदेश देशातील कॅलिफोर्निया असे जर म्हटले तर कदाचित अतिशयोक्ती वाटू शकते. पण तरीसुद्धा निसर्गाचा वरदहस्त असलेल्या या कोकणपट्टी किनारपट्टीवर मागील काही वर्षांपासून निसर्गाची वक्रदृष्टी आपण अनुभवत असून एकामागून एक संकटं कोकणावर आदळत आहेत. कोकणाला आपला दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. आजवर कोकणी माणसाने अनेक वादळे अंगावर झेलून त्यातून सावरत तो पुढे उभा राहिला आहे. याआधी फयान, निसर्ग आणि आता तौक्ते अशा या वादळातून सावरताना मागील दीड वर्षापासून कोरोना या महामारीशी झुंज देताना या संपूर्ण कोकणाची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे विसकटून गेली असून कुटुंब व्यवस्थासुद्धा अडचणीत येऊ लागली आहे. मुळातच कोकणी माणूस हा कष्टाळू आणि दोन-तीन एकरी शेती-बागायतीत समाधानी वृत्तीने आपला उदरनिर्वाह करणारा. परंतु दिवसेंदिवस हवामानातील होत जाणारे बदल, पर्यावरणाचा होत चाललेला ऱहास यामुळे निसर्ग व हवामानाचा कारभारसुद्धा बेभरवशाचा होत चालला आहे. त्यामुळे निसर्ग आपल्या मर्यादा ओलांडू लागला आहे. एकामागून एक येणाऱया संकटांतून कोकण कधी सावरणार आहे, हाच प्रश्न पडू लागला आहे. नैसर्गिक संपत्तींचे जतन आणि त्यावर उपजीविका करणे हे आता कितपत आणि कसे साध्य होणार, हाच मोठा प्रश्न पडू लागला आहे. नुकताच काही तज्ञ व अभ्यासू व्यक्तींनी असा अंदाज व्यक्त केला आहे की, यापुढे भविष्यात अशी वादळे व संकटे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यादृष्टीने आपण सजग, जागृत असणे अत्यंत गरजेचे आहे. याचा विचार करता कोकणी माणसाने आपला दृष्टिकोन योग्य त्या पद्धतीने बदलण्याची गरज आहे. त्यानुसार आता नवीन पिढय़ांनी काही बदल नक्कीच आत्मसात केले आहेत. म्हणजेच मूळ असलेल्या उद्योगाला पूरक असे लघु गृह उद्योग-व्यवसाय सुरू केले आहेत. केळीची पाने, विविध फळांचे रस, कोकम सरबत, सॉस, विविध प्रकारातील फ्लेवर, काजू यासारखे पूरक व्यवसाय तर कोकण किनारपट्टीला असलेले निसर्ग सौंदर्य लक्षात घेता पर्यटन व त्याला पूरक असे छोटे व्यवसाय त्यामुळे मागील काही वर्षे कोकण खऱया अर्थाने सक्षम आणि सधन होता. पण मागील काही वर्षांत हवामानातील बेभरवशी कारभार, येणारी वादळे, बेसुमार वादळी पाऊस यामुळे कोकणाचे प्रचंड नुकसान होत चालले आहे. यामुळे उद्योग, विकास, शेतीतील नुकसान आणि त्याचे आर्थिक परिस्थितीवर होत असलेले नुकसान लक्षात घेता कोकणी माणूससुद्धा आता हतबल होऊ लागला आहे. निसर्गाची वक्रदृष्टी आणि येणारी संकटे लक्षात घेता उद्योग, विकास याला चालना कशी मिळेल, केवळ शेती व बागायत यावर अवलंबून न राहता पर्यावरणाचा समतोल ठेवत अधिकाधिक उद्योग व व्यवसायाला चालना देऊन, जास्तीत जास्त रोजगार निर्माण करून कोकणची आर्थिक घडी अधिक बळकट कशी होईल, या दृष्टिकोनातून विचार करण्याची गरज आहे आणि तसे केल्यानेच पुढे किती संकटे जरी आली तरी कोकणी माणूस तेवढय़ाच धैर्याने त्याला तोंड देऊन निसर्गावरील संकटावर मात करेल यात काही शंका नाही.
– pkathalekar@gmail.com