खासगी लसीकरणाचे महारॅकेट, कांदिवलीच्या शिवम रुग्णालयाचे लायसन्स कायमस्वरूपी रद्द
बनावट लसीकरण प्रकरणी मुंबई महापालिकेने आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली. कांदिवलीतील शिवम रुग्णालयाचे लायसन्स कायमस्वरूपी रद्द करून रुग्णालय सील केले. मुंबईत बनावट लसीकरण रॅकेट उघड झाल्यानंतर तब्बल 2 हजार 600 लाभार्थ्यांना लसीऐवजी ग्लुकोजचे पाणी देण्यात आल्याचे समोर आले. याप्रकरणी शिवम रुग्णालयाविरोधात तक्रारी आल्यानंतर तपासात शिवम रुग्णालय प्रशासन दोषी आढळले. त्यामुळे शिवम रुग्णालयाचा परवाना रद्द करावा, अशी सूचना मुंबई पोलिसांनी महापालिकेला केली होती. त्यानुसार महापालिकेने ही कारवाई केली.
काय आहे प्रकरण
कांदिवली येथील हिरानंदानी हेरिटेज येथील लसीकरण घोटाळा उघडकीला आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. बनावट लसीकरणप्रकरणी बोरिवली, वर्सेवा, खार, भोईवाडा, बांगुरनगर पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी आतापर्यंत 8 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या चौकशीत लसींचा पुरवठा कांदिवलीच्या चारकोप येथील शिवम रुग्णालयातून केल्याचे उघड झाले.
मुंबईतील बनावट लसप्रकरण मुंबई महापालिकेने गांभीर्याने घेतले असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. पोलीस तपासात या रुग्णालयाची मोठी भूमिका समोर आली आहे. त्यामुळेच शिवम रुग्णालयाचे लायसन्स पालिकेने कायमस्वरूपी रद्द केले आहे. – विश्वास शंकरवार सहआयुक्त, झोन 7
बनावट लसीकरण प्रकरणात आणखी एकाला अटक, बोगस प्रमाणपत्र बनवून द्यायचा
बनावट लसीकरणप्रकरणी समतानगर आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल गुह्यातील एका भामटय़ाला पोलिसांनी अटक केली आहे. अनुराग त्रिपाठी (20) असे त्याचे नाव असून या प्रकरणातील ही 14 वी अटक आहे.
मनीष त्रिपाठी आणि त्याच्या सहकाऱयांनी समतानगर व अंधेरीत आयोजित केलेल्या लसीकरण क@म्पमध्ये अनुरागनेदेखील सहभाग घेतला होता. त्याने त्या क@म्पमध्ये नागरिकांची माहिती घेऊन त्याआधारे लसीकरण झाल्याचे बोगस प्रमाणपत्र बनवून दिले होते. अनुरागची बनावट लसीकरण क@म्पमधील भूमिका स्पष्ट झाल्यानंतर समतानगर पोलिसांनी त्याला आज अटक केली. अनुराग हा मूळ चालक असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.