सामना अग्रलेख – उष्णतेच्या लाटेचा इशारा
कोरोनाची लाट नैसर्गिक आहे की मानवनिर्मित या वादावर जगभरात सध्या खल सुरू आहे, पण आता जी उष्णतेची लाट कॅनडा-अमेरिकेसह जगातील अनेक देशांमध्ये आली आहे ती मानवनिर्मितच आहे. कोरोनाची लाट लसीकरण आणि इतर मार्गांनी रोखता येईल, पण उष्णतेच्या लाटा कशा थोपविणार? विकास की पर्यावरण या नेहमीच्याच गुंत्यात अडकून राहायचे की त्यापलीकडे जाऊन उष्णतेच्या लाटांचे तडाखे टाळायचे, या प्रश्नाचा प्राधान्याने आणि गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. जगातील अनेक देशांत आलेल्या उष्णतेच्या लाटेचा इशारा तोच आहे. जगातील दुसऱया क्रमांकाचा थंड देश असलेल्या कॅनडात ठिकठिकाणी ‘कूलिंग सेंटर्स’ उघडण्याची वेळ आली आहे. ‘ग्लोबल वॉर्मिंग’चा आणखी कोणता हाय ऍलर्ट हवा?
सध्या जगात सर्वत्र फक्त कोरोनाच्या लाटांचीच चर्चा होत आहे. मागील दीड वर्षापासून कोरोनाच्या लाटांवर लाटा येत आहेत. हिंदुस्थानसह जगातील दोनशेच्या वर देशांनी या लाटांचे तडाखे सहन केले आहेत. अजूनही या लाटा ओसरलेल्या नाहीत. मात्र आता आणखी एका लाटेने जगाची चिंता वाढवली आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये उष्णतेच्या लाटेने थैमान घातले आहे. त्यातही थंड आणि बर्फाच्छादित समजल्या जाणाऱया देशांमध्ये या लाटेने हाहाकार माजविला आहे. कॅनडा हा जगातील दुसऱया क्रमांकाचा थंड देश. मात्र हा देश उष्णतेच्या लाटेच्या तडाख्यात सापडला आहे. हा तडाखा एवढा भयंकर आहे की, त्यात आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. तेथील ब्रिटिश कोलंबिया राज्यात गेल्या पाच दिवसांत 486 लोकांचा ‘अचानक आणि अनपेक्षित मृत्यू’ झाल्याचे नोंदविण्यात आले आहे. हीच स्थिती व्हँकुवर शहरातही आहे. सर्वसाधारणपणे जून महिन्यात या ठिकाणचे तापमान सरासरी 20 अंश सेल्सिअस असते. मात्र यंदा ते थेट दुपटीने वाढले आहे. लिटन या शहरात पारा थेट 49 अंशाच्या वर गेला. इतरही बऱयाच शहरांत तो 44-45 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. अमेरिकेतही उष्णतेच्या लाटेचे थैमान सुरू आहे. वॉशिंग्टनमध्ये आतापर्यंत या लाटेने 30 लोकांचे बळी घेतले आहेत, तर ओरेगॉन राज्यात 60 पेक्षा जास्त लोक
उष्माघाताने
मरण पावले आहेत. खरे म्हणजे उष्णतेच्या या लाटांचे इशारे-नगारे पर्यावरण तज्ञ अनेक दशकांपासून वाजवीत आहेत. तापमानातील वाढ हा सर्वाधिक जागतिक चिंतेचा विषय बनलाच आहे. मात्र माणसांनी ते गांभीर्याने घेतले नाही. गेल्या काही वर्षांत जागतिक पातळीवर प्लॅटफॉर्म उभा करण्यात आला असला किंवा कठोर नियमावली करण्यात आली असली तरी विकासाच्या नावाखाली जगाने पर्यावरणाशी जी अक्षम्य छेडछाड केली आणि अजूनही ती सुरूच आहे. त्याचे भयंकर दृश्य परिणाम आता दिसू लागले आहेत. कॅनडासारख्या देशात उष्णतेची लाट येते आणि 130 पेक्षा जास्त लोकांचा जीव घेते हा वातावरणातील भयंकर बदलांचाच एक भाग आहे. कॅनडा, अमेरिका तर खूप दूर राहिले, दोन दिवसांपूर्वी आपल्या दिल्ली शहरानेही उष्णतेचा नवा उच्चांक गाठला. मागील 90 वर्षांतील सर्वाधिक ‘उष्णतेची लाट’ (हिट वेव्ह) दिल्लीकर सध्या अनुभवत आहेत. दिल्ली परिसरात सध्या तापमानाची पातळी 44-45 अंश सेल्सिअस एवढी आहे. मुंबईसह महाराष्ट्रातही उष्मा वाढलेलाच आहे. वास्तविक, सध्याचा माहोल मान्सूनचा आहे. तथापि, पाऊस गायब झाला आहे आणि वाढत्या उष्म्याने लोकांना बेहाल करून सोडले आहे. महाराष्ट्रातही मागील 10 वर्षांत तापमान सरासरीपेक्षा अधिकच राहिले आहे. तसे
उन्हाळय़ातील प्रचंड उष्मा
किंवा एरव्हीदेखील उन्हाचे प्रमाण जास्त असणे आपल्यासारख्या देशांना नवीन नाही, पण कॅनडा, अमेरिकेसारख्या थंड देशांमध्ये उष्णतेची लाट येऊन दोनशे-तीनशे माणसे त्यात दगावणे हे नक्कीच विचित्र आहे. अर्थात धक्कादायक मात्र नाही. कारण मागील तीन-चार वर्षांपासून कॅनडामध्ये उष्णतेची लाट येत आहे आणि त्यात बळीही जात आहेत. मागील 100 वर्षांत ज्या बेलगाम पद्धतीने जगाने पर्यावरणाची ऐशी की तैशी केली, त्यामुळे हे कधी ना कधी होणारच होते. कोरोनामुळे गेल्या वर्षी जगभरात झालेल्या ‘लॉक डाऊन’मुळे पर्यावरण आणि वातावरणावर कसे चांगले परिणाम झाले याचे चित्र उभे राहिले. त्यात तथ्य नव्हते असे नाही, पण नंतरच्या ‘अनलॉक’ने पुन्हा पहिले पाढे पंचावन्नच झाले. कोरोनाची लाट नैसर्गिक आहे की मानवनिर्मित या वादावर जगभरात सध्या खल सुरू आहे, पण आता जी उष्णतेची लाट कॅनडा-अमेरिकेसह जगातील अनेक देशांमध्ये आली आहे ती मानवनिर्मितच आहे. कोरोनाची लाट लसीकरण आणि इतर मार्गांनी रोखता येईल, पण उष्णतेच्या लाटा कशा थोपविणार? विकास की पर्यावरण या नेहमीच्याच गुंत्यात अडकून राहायचे की त्यापलीकडे जाऊन उष्णतेच्या लाटांचे तडाखे टाळायचे, या प्रश्नाचा प्राधान्याने आणि गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. जगातील अनेक देशांत आलेल्या उष्णतेच्या लाटेचा इशारा तोच आहे. जगातील दुसऱया क्रमांकाचा थंड देश असलेल्या कॅनडात ठिकठिकाणी ‘कूलिंग सेंटर्स’ उघडण्याची वेळ आली आहे. ‘ग्लोबल वॉर्मिंग’चा आणखी कोणता हाय ऍलर्ट हवा?