परीक्षण – अवलियाचा जीवनपट
>> पराग पोतदार
अनेकदा माणसं धोपट मार्गानं जगत राहतात आणि वेगळ्या वाटा धुंडाळण्याचं धाडस करीत नाहीत. काही माणसांचा मात्र रक्तगटच वेगळा असतो. त्यांच्या जीवनाचं ध्येयच जणू काही वेगळं असतं आणि त्यासाठी त्यांनी त्यांचं आयुष्य वाहून घेतलेलं असतं. अनेक प्रतिकूलतांवर मात करीत आणि प्रसंगी जिवावर बेतलं तरी त्या विषयातील त्यांची ओढ जराही कमी होत नाही. याचं मूर्तिमंत असं उदाहरण म्हणजे राजेश ठोंबरे नावाचा सर्पप्रेमी अवलिया.
लेखिका मृणालिनी चितळे यांनी त्यांचं आगळंवेगळं आणि धाडशी आयुष्य अतिशय समर्पक शब्दांतून उभं केलं आहे. चाळीस गावात राहणारे राजेश ठोंबरे यांचा जीवनपट उभा करीत असताना गरिबीने उभी केलेली खडतर परिस्थिती, आर्थिक विपन्नतेशी करावा लागणारा झगडा आणि एकीकडे वन्यजीव, सापांविषयी वाढत असलेली ओढ आणि त्या सर्वांतून त्यांनी केलेली समाजजागृती या सगळ्यांचा पट या पुस्तकातून आपल्याला वाचायला मिळतो.
अगदी बालपणापासून वन्यजिवांविषयी असणारं कमालीचं कुतूहल पुढे जाऊन जीवनध्यास बनेल अशी कल्पना खुद्द राजेश ठोंबरे यांनीही कधी केली नसेल. पण ते कुतूहल लहानपणी स्वस्थ बसू देत नव्हतं. प्रत्येक वन्यजीव जवळून पाहावा, समजून घ्यावा असं वाटायचं. घरातील सर्वांच्या नकळत हे प्राणीप्रेम विकसित होत होते. अपवाद होता तो फक्त आजीचा. आजीला सगळे माहीत होते तरीही आजीने आपल्या नातवाच्या या आगळ्यावेगळ्या आवडीला कधीही मुरड घातली नाही आणि त्यातून त्यांचे एक वेगळेच व्यक्तिमत्त्व साकारत गेले. ही ओढ स्वस्थ बसू देत नसल्याने प्राणीविश्व जवळून अनुभवावे असे त्यांना वाटले. वन्य प्राण्यांची शिकार आदिवासी कसे करतात आणि कसे राहतात हे समजून घेण्यासाठी राजेश ठोंबरे चक्क त्यांच्यात जाऊन राहिले. त्यांच्यातले वाटावे म्हणून त्यांच्यासारखे कपडे परिधान करून जगू लागले. इतकंच काय उंदराची, डुकरांची शिकार करायला शिकले आणि हळूहळू खायलासुद्धा शिकले! आदिवासी समाजातील अनेक प्रथा-परंपरा त्यांना यानिमित्ताने समजल्या. आदिवासी समाजातील काही लोक उत्पन्नाचे साधन म्हणून घुबड पाळतात. त्या घुबडांना रात्रीच्या वेळी टी आकाराची काठी करून त्यावर बसवतात. हे घुबड रात्रीच्या वेळी शेतात घुसणारे उंदीर मारून खातात. त्यांनी उंदीर खाल्यानंतर केलेली उलटी किंवा त्यांच्या तुटलेल्या शेपटय़ा यावरून किती उंदिर मारले हे ठरते व त्यानुसार आदिवासींना त्याचा मोबदला मिळत जातो अशी विलक्षण माहिती यानिमित्ताने राजेश ठोंबरे यांना समजत गेली.
हळूहळू सापांविषयीची ओढ वाढत गेली. सापांविषयी भीती म्हणून कधी नव्हतीच. पण हळूहळू त्या विषयाचा अभ्यास होत गेला. विषारी साप, बिनविषारी साप असे प्रकार लक्षात येत गेले. लोकांच्या मनात सापांविषयी किती भीती असते आणि किती प्रकारचे गैरसमज जोपासलेले असतात हेही त्यांना लक्षात येत गेले. अगदी सुरुवातीला लहानपणी अनेक साप घरात आणून बरण्यांमध्ये ठेवायचे. पुढे पुढे सापांविषयीच्या ओढीने तर ते सापांकडे इतके आकर्षिले गेले की कुठेही साप सापडला की राजेश ठोंबरे यांना बोलावले जायचे. त्यामुळे सर्पमित्र ही त्यांची ओळख निर्माण झाली.
सापांच्या सहवासात राहत असताना एकदा नागाच्या दंशाने अगदी मरणाच्या दारातून हा माणूस परत आला. त्याची संपूर्ण कहाणी वाचताना आपल्याही अंगावर शहारा येतो. या सगळ्या सर्पप्रेमातूनच पुढे जीवनदिशा सापडत गेली. सापांविषयी लोकांच्या मनात असणारी अंधश्रद्धा, त्यातून पाळल्या जाणाऱया चुकीच्या प्रथा, सापांविषयीच्या भीतीतून त्यांना मारण्याचे होणारे प्रकार, अनेक ठिकाणी गावागावांत पसरलेल्या अंधश्रद्धा या सगळ्यांतून एक सामाजिक जाणीव विकसित होत गेली आणि त्यांनी या विषयात स्वतःला वाहून घेतले. या सगळ्यातून एक संवेदनशील व्यक्तिमत्त्व आकाराला आले. अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि नरेंद्र दाभोलकरांच्या संपर्कात आल्यानंतर तर जीवनाला एक वेगळाच आयाम प्राप्त झाला.
राजेश ठोंबरे या सर्पविश्वात आणि वन्यजिवांमध्ये रंगलेल्या अवलियाचा जीवनप्रवास रानावनांत फिरून लिहिलेला असल्याने एक रसरशीत जीवनपट आपल्यासमोर निश्चितपणाने उभा राहतो.
रंगुनी रानात साऱया
लेखिका ः मृणालिनी चितळे
प्रकाशक ः राजहंस प्रकाशन
मूल्य ः रुपये 320/-